भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या मैदानावरील कुल अंदाजाने सर्वांना चांगलाच भावला आहे. तो ज्या कुल अंदाजात खेळाडूला यष्टिचित करतो, तोही आजकाल चर्चेचा विषय ठरतोय. याच कारण कधी त्याची चपळाई ठरते. तर कधी चतुराई. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धोनीचा आणखी एक अंदाज पाहायला मिळाला. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरला त्याने ज्या पद्धतीने बाद केले तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसतो आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने यष्टीचित झालेला फलंदाज बाद आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा तिसऱ्या पंचांचा निर्णय घेताना नक्की पाहिले असेल. त्यामध्ये जसे संथगतीने व्हिडिओ प्ले करुन पंच चाचपणी करत असतात अगदी तसाच काहीसा प्रकार धोनीने मैदानात केल्याचे दिसले.

क्विन्स पार्क ओव्हलच्या मैदानात रविवारी रंगलेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर डोंगराएवढे लक्ष ठेवले होते. सामन्यातील ३६ व्या षटकातच वेस्ट इंडिजच्या विजयाचा मार्ग धुसर झाला होता. यावेळी ४२ चेंडूत वेस्ट इंडिजला विजयासाठी तब्बल १३८ धावांची गरज होती. संघ पराभवाच्या छायेत असतानात जेसन होल्डर आणि रोस्टन चेस यांनी सहाव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी करुन मैदानात तग धरला होता. यावेळी धोनीने होल्डरला २९ धावांवर यष्टीचित केले. नवख्या आणि अनोख्या शैलीत गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवचा एका चेंडू सीमारेषेपलीकडे भिरकावण्याच्या इराद्याने होल्डरने हालचाली केल्या. मात्र, कुलदीपने त्याला चकवण्यात यश मिळवले. किस्सा इथे संपला नाही. नेहमीप्रमाणे धोनीने सहज चेंडू पकडला. पण यष्टिचित न करता तो होल्डरकडे पाहत राहिला. त्याने इतक्या संथगतीने यष्टीचित केले की, तो होल्डरला अप्रत्यक्षपणे आत येऊ शकत असशील तर ये बाबा… असा इशाराच जणू तो देत होता. यावेळी धोनीच्या चेहऱ्यावरील हास्याचा आनंद तुम्हाला या व्हिडिओतूनच मिळू शकतो. एका नेटिझन्सने धोनीने होल्डरला यष्टिचित केलेला व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. अनेकजण या व्हिडिओला पसंती देताना दिसत आहे.

हटके अंदाजात प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याची धोनीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याने यष्टीकडे न पाहाता केलेले यष्टीचित आणि फलंदाजला कळण्याअगोदर उडवलेल्या बेल्स अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र होल्डरचा किस्सा यापेक्षा निराळा असाच होता.