चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत इंग्लंडला ४-० अशा फरकाने पराभूत करील, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने व्यक्त केले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला २३ नोव्हेंबरपासून मुंबईत प्रारंभ होत आहे.
अहमदाबादचा पहिला कसोटी सामना सोमवारी नऊ विकेट राखून जिंकल्यानंतर आता भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. मुंबईची खेळपट्टी फिरकीला अधिक साथ देईल. त्यामुळे यजमान संघाला त्याचा चांगला फायदा मिळेल, असे रमीझने सांगितले.
‘‘इंग्लंडने मुंबई कसोटी गमावल्यास भारत या मालिकेत वर्चस्व गाजवेल, हे स्पष्ट होईल. त्यामुळे मालिका ४-० अशा फरकाने जिंकून इंग्लंडला ‘व्हाइट वॉश’ देणे भारताला शक्य होईल,’’ असे रमीझने म्हणाला. ‘‘या मालिकेत भारताला अधिक संधी आहे. पण इंग्लंडनेही भिडस्त वृत्तीने प्रतिकार केल्यास मालिका रंगतदार होऊ शकेल,’’ असे तो पुढे म्हणाला.
‘‘भारतीय खेळपट्टय़ांवर इंग्लिश गोलंदाजी दुबळी भासत आहे. याचप्रमाणे फिरकी गोलंदाजीत आपण उजवे आहोत,’’ असे स्पष्टीकरण रमीझने दिले. अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यात अनुक्रमे २०६ आणि ४१ धावा काढणाऱ्या सामनावीर चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचे रमीझ राजाने कौतुक केले.
‘‘पुजाराने अप्रतिम खेळी साकारल्या. तांत्रिकदृष्टय़ा इंग्लिश संघ दुबळा वाटत असला तरी मानसिकदृष्टय़ा तो समर्थ संघ आहे. अशा संघाविरुद्ध द्विशतक साकारणे हे आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीचेच लक्षण आहे’’, असे रमीझने सांगितले. परंतु पुजाराची राहुल द्रविडशी तुलना करू नये, असेही त्याने म्हटले. ‘‘पुजाराची द्रविडशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. द्रविड मला स्वत: म्हणाला होती की मी जेव्हा पुजाराच्या वयाचा होतो, तेव्हा मी इतक्या आत्मविश्वासाने खेळत नव्हतो,’’ असे रमीझ यावेळी म्हणाला.