दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारत पराभूत झाल्यास एमआरएफ टायर्स आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीमधील संघांच्या यादीतील दुसरे स्थान त्यांना गमवावे लागणार आहे. या दोन संघांत अनुक्रमे २७ आणि २८ ऑगस्ट या दिवशी फ्लोरिडा (अमेरिका) येथे सामने होणार आहेत.

भारताच्या खात्यावर सध्या १२८ गुण जमा आहेत. क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडकडे चार गुण अधिक आहेत, तर तिसऱ्या स्थानावरील वेस्ट इंडिजच्या खात्यावर १२२ गुण जमा आहेत.

काही महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत चार सलग षटकारांची आतषबाजी करणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटकडे सध्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. विंडीजने भारताविरुद्धची मालिका जिंकल्यास त्यांच्या खात्यावर १२७ गुण जमा होतील आणि ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जातील, तर भारत १२४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर फेकला जाईल. परंतु जर भारताने ही मालिका २-० अशी जिंकली, तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाच्या आणि न्यूझीलंडच्या खात्यावर प्रत्येकी १३२ गुण जमा असतील. मात्र दशांश गुणांनुसार भारताला दुसरे स्थान दिले जाईल. या परिस्थितीत वेस्ट इंडिजचा संघ (११८ गुण) चौथ्या स्थानावर जाईल. कारण तो दक्षिण आफ्रिकेपेक्षा एका गुणाने पिछाडीवर असेल. ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यास भारत (१२८ गुण) आणि वेस्ट इंडिज (१२३ गुण) यांच्या क्रमांकांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.

या मालिकेत वैयक्तिक कामगिरीनुसार क्रमवारीवरसुद्धा प्रभाव दिसून येणार आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सर्वाधिक ८३७ गुणांसह फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ३४ गुणांच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे कोहली आपले स्थान अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. या क्रमवारीतील भारताचा दुसरा फलंदाज रोहित शर्मा हा २३व्या स्थानावर आहे, तर धोनी ५०व्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आठव्या स्थानावर आहे, अनुभवी मार्लन सॅम्युअल्स १७व्या, लेंडल सिमन्स ३१व्या, ड्वेन ब्राव्हो ३७व्या आणि आंद्रे फ्लेचर ४८व्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजच्या दोन फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. लेग-स्पिनर सॅम्युअल बद्री अव्वल स्थानावर आहे, तर ऑफ-स्पिनर सुनील नरिन चौथ्या स्थानावर आहे. याचप्रमाणे मध्यमगती गोलंदाज ड्वेन ब्राव्हो ३९व्या स्थानावर आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर दमदार कामगिरी बजावणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन सातव्या स्थानावर आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा १९व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दोन्ही संघांपैकी फक्त मार्लन सॅम्युअल्स पाचव्या स्थानावर आहे.