सहा षटकांमधली तीन षटके निर्धाव आणि चार धावांत चार बळी अशी नेत्रदीपक कामगिरी दुर्मीळच, पण भारताचा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने असा तिखट मारा करत बांगलादेशच्या संघाचा धुव्वा उडवला. त्याच्या या भेदक कामगिरीच्या जोरावर भारताने युवा (१९-वर्षांखालील) तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा भारताने ७६ धावांमध्ये खुर्दा उडवला.

पहिल्याच चेंडूवर अव्हेशने बांगलादेशचा सलामावीर सेफ हसनला (०) त्रिफळाचीत केले. त्यानंतर सातत्याने बळी मिळवत त्याने बांगलादेशची ५ बाद २६ अशी दयनीय अवस्था केली आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला; पण त्यांना १५८ धावा करता आल्या.