आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरूष हॉकी संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटलेल्या या सामन्याच्या पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर ४-२ अशी थरारक मात करत गेल्या १६ वर्षांपासूनचा सुवर्णपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला.
या विजयासोबत भारताचे रिओ ऑलिम्पिकचेही तिकीट पक्के झाले आहे. सामन्याच्या सुरूवातीलाच तिसऱया मिनिटाला पाकिस्तानने गोल करत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघ डळमळताना दिसला पण, सामन्याच्या दुसऱया सत्रात भारतीय संघाने गोल करत बरोबरी साधली. अखेरपर्यंत सुरू असलेल्या या चुरशीच्या लढाईत निर्धारित वेळेच्या शेवटी सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले. भारतीय हॉकीपटूंनी पाकला पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ ने धूळ चारली आणि आशियाई स्पर्धेत इतिहास रचला. या विजयासोबत आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत ८ सुवर्णपदके जमा झाली आहेत.