इंग्लंडमध्ये रंगलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केल्याप्रकरणी महिला संघावर बक्षिसांची घोषणा झाली. बुधवारी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) विश्वचषकातील सदस्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांचा धनादेश तर त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकारी स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी विश्वचषकातील कामगिरीबद्दल महिला संघाचे अभिनंदन केले. प्रत्येक सामन्यात खेळात सुधारणा करत भारतीय महिलांनी विश्वचषकात लक्षवेधी कामगिरी केली. ही कामगिरी भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील महिला खेळाचे कौतुक केले. भारतीय कर्णधार मिताली आणि हरमनप्रीत कौरसह १५ सदस्यीय संघातील १० सदस्य हे रेल्वेशी संलग्नित असल्याचे सांगत प्रभूंनी त्यांचे अभिनंदन केले. क्रिकेटच्या मैदान गाजवणाऱ्या ब्लू जर्सीतील महिलांनी देशातील इतर महिलांना आत्मविश्वास दिला. आपल्याकडे क्रिकेट हा पुरुषी खेळ म्हणून ओळखला जायचा, पण काळ बदलला असून महिलाही क्रिकेटचे मैदान गाजवू शकतात, हेच भारतीय महिला संघाने दाखवून दिले, असे ट्विट प्रभू यांनी केले.

यंदाच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात अटीतटीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत केले. लॉर्डसच्या मैदानावर अवघ्या नऊ धावांनी भारताला पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्यातील पराभवानंतरही महिला संघावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकला नसला तरी लाखो चाहत्यांचे मनं जिंकली. मितालीची नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार मितालीने हा विश्वचषक अखेरचा असल्याचे देखील सांगितले. एकूणच भारतीय संघाचा हा प्रवास खास असल्याचे देशवासियांनी अनुभवले.