विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एक वर्षांपासूनचा कसोटी विजयाचा दुष्काळ सोमवारी संपवला. जुलै २०१४ मध्ये भारताने लॉर्डस्वर अखेरचा कसोटी विजय साजरा केला होता. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा या फिरकी जोडगोळीने फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने २७८ धावांनी दणदणीत विजय साजरा करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. भारताच्या विजयामुळे कारकीर्दीतील अखेरची कसोटी खेळणाऱ्या कुमार संगकाराला पराभवाने निरोप घ्यावा लागला.
४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १३४ धावांत गुंडाळून भारताने मालिकेत बरोबरी साधली. अश्विनने ४२ धावांत ५ गडी टिपून श्रीलंकेचे कंबरडे मोडले. मिश्राने २९ धावांत ३ बळी घेत उरलेली कसर पूर्ण केली. कर्णधार म्हणून कोहलीचा हा पहिला कसोटी विजय ठरला. पहिल्या दिवसापासून सामन्यावर पकड मजबूत केलेल्या भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत स्तुत्य कामगिरी केली. पाचव्या दिवशी श्रीलंकेचा डाव इतक्या लवकर संपुष्टात येईल, असे कुणालाच वाटत नव्हते. उपाहारापर्यंत त्यांचे सात फलंदाज अवघ्या ५८ धावांत तंबूत परतले होते. उपाहारानंतर मिश्राने दुशमंथा चमिराला फिरकीच्या जाळ्यांत ओढून श्रीलंकेचा पराभव निश्चित केला.
श्रीलंकेने २ बाद ७२ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात केली. उमेश यादवने कर्णधार अँजेलो मॅथ्युजला यष्टीमागे उभ्या असलेल्या लोकेश राहुल करवी झेलबाद करून श्रीलंकेच्या डावाला सुरुंग लावला. त्यानंतर मिश्रा, अश्विन आणि इशांत शर्मा यांनी टप्प्याटप्याने यजमानांच्या फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी चोख बजावली. भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर बनलेल्या दिमुथ करुणारत्नेला अश्विनने त्रिफळाचीत केले. करुणारत्नेने एकाकी खिंड लढवीत १०३ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांची खेळी केली. करुणारत्ने बाद होताच अवघ्या ११ धावांत मिश्राने तळाच्या फलंदाजांना माघारी धाडून विजयी जल्लोष केला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३९३
श्रीलंका (पहिला डाव) : ३०६
भारत (दुसरा डाव) : ८ बाद ३२५ डाव घोषित
श्रीलंका (दुसरा डाव): कौशल सिल्वा झे. स्टुअर्ट बिन्नी गो. आर. अश्विन १, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आर. अश्विन ४६, कुमार संगकारा झे. मुरली विजय गो. आर. अश्विन १८, अँजेलो मॅथ्युज झे. लोकेश राहुल गो. उमेश यादव २३, दिनेश चंडिमल त्रि. गो. अमित मिश्रा १५, लाहिरु थिरिमाने झे. पुजारा (बदली खेळाडू) गो. आर. अश्विन ११, जेहान मुबारक झे. विराट कोहली गो. इशांत शर्मा ०, धम्मिका प्रसाद झे. अमित मिश्रा गो. आर. अश्विन ०, रंगना हेराथ नाबाद ४, थरिंदू कौशल पायचीत गो. अमित मिश्रा ५, दुशमंथा चमिरा पायचीत गो. अमित मिश्रा ४. अवांतर – ७; एकूण – ४३.४ षटकांत सर्व बाद १३४
बाद होण्याचा क्रम : १-८ , २-३३, ३-७२, ४-९१ , ५-१०६ , ६-१११, ७-११४, ८-१२३ , ९-१२८ , १०-१३४.
गोलंदाजी : आर. अश्विन १६-६-४२-५, उमेश यादव ७-१-१८-१, इशांत शर्मा ११-२-४१-१, अमित मिश्रा ९.४-३-२९-३.
सामनावीर : लोकेश राहुल.

योग्य वेळी आम्हाला फलंदाजी करण्यात अपयश आले. अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वोत्तम खेळ करण्यात आम्ही अपयशी ठरलो. पहिल्या डावातील निराशाजनक कामगिरीमुळे हा पराभव झाला. भारताने सकारात्मक खेळ करत ४०० हून अधिक धावांची आघाडी घेत आम्हाला अडचणीत आणले.
– अँजेलो मॅथ्युज, श्रीलंकेचा कर्णधार

पहिल्या कसोटीतील पराभवाला बाजुला सारून आम्ही खेळ केला आणि अशा पद्धतीने पुनरागमन केले. या विजयामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला आहे आणि पुढील सामन्यात अधिक सकारात्मक खेळ करण्याशी ऊर्जा मिळाली आहे. मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर आहे.
– लोकेश राहुल, भारताचा फलंदाज