झीशान अन्सारीचे पाच बळी
ऋषभ पंतच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर युवा (१९ वर्षांखालील) तिरंगी क्रिकेट स्पध्रेत भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २६६ धावांची खेळी केली. सलामीवीर ऋषभ पंतने १४ चौकार आणि ४ षटकारांसह ९८ चेंडूंत ११८ धावांची तडाखेबंद खेळी केली. विराट सिंगने ७१, तर रिकी भुईने ५० धावा करत ऋषभला चांगली साथ दिली. या तिघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला २६६ धावांचीच मजल मारता आली. अफगाणिस्तानतर्फे मुस्लीम मुसा आणि मोहम्मद झाहीर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणिस्तानचा डाव १६२ धावांतच आटोपला. सलामीवीर नावीद ओबेदने ९ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली. भारतातर्फे झीशान अन्सारीने ३७ धावांत ५ बळी घेत अफगाणिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. साखळी गटाच्या शेवटच्या लढतीसह भारतीय संघाने १८ गुणांसह अव्वल स्थान राखले. रविवारी भारत व बांगलादेश यांच्यात अंतिम लढत होईल.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ७ बाद २६६ (ऋषभ पंत ११८, विराट सिंग ७१, रिकी भुई ५०; मुस्लीम मुसा २/३८) विजयी विरुद्ध अफगाणिस्तान : २८ षटकांत सर्वबाद १६२ (नावीद ओबेद ६३; झीशान अन्सारी ५/३७)