विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संभाव्य ३० खेळाडूंची नावे जाहीर
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱया आगामी विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य संघाची घोषणा गुरूवारी करण्यात आली. यंदाच्या विश्वचषकासाठी नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली असून मागील विश्वचषकाच्या जेतेपदात मोलाचा वाटा असलेल्या सेहवाग, गंभीर, युवराज, हरभजन, झहीर यांना स्थान देण्यात आलेले नाही. संभाव्य संघात महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबीन उथप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू यांची नावे आधीपासूनच निश्चित मानली जात होती. त्यावर बैठकीनंतर शिक्कामोर्तब झाले आणि अधिकृतरित्या त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. या खेळाडूंसह अक्षर पटेल, संजू सॅमसन, परवेज रसूल, कर्ण शर्मा, मनिष पांडे, वृद्धीमान सहा, कुलदिप यादव, धवल कुलकर्णी यांची देखील संभाव्य संघात वर्णी लागली आहे.
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समितीची गुरुवारी एक वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर विश्वचषकासाठीच्या संभाव्य संघाच्या यादीत एकूण ३० जणांची नावे निश्चित करण्यात आली. यामध्ये प्रत्येक खेळाडूला एक पर्याय ठेवण्यात आला आहे. यातून ७ जानेवारी रोजी अंतिम १५ जणांच्या नावांवर विश्वचषकासाठी शिक्कामोर्तब होईल. संभाव्य यादीत महाराष्टाच्या केदार जाधव, धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि उमेश यादव या पाच खेळाडूंचा समावेश आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठीचे संभाव्य खेळाडू-
महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, केदार जाधव, मनोज तिवारी, मनोज पांडे, वृद्धीमान सहा, संजु सॅमसन, आर. अश्विन, परवेझ रसूल, करन शर्मा, अमित मिश्रा, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, वरूण अॅरॉन, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, अशोक दिंडा, कुलदीप यादव, मुरली विजय