कर्ण शर्मा आणि शाहबाझ नदीम यांच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने दुसरा अनौपचारिक कसोटी सामना सहजपणे जिंकला. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या ‘अ’ संघावर एक डाव आणि २६ धावांनी दणदणीत विजय मिळवीत २-० अशा फरकाने मालिकाही खिशात टाकली. कर्णने पाच आणि नदीमने चार बळी मिळवीत न्यूझीलंडचा दुसरा डाव २१० धावांवर आटोपला.

मंगळवारी १ बाद १०४ या धावसंख्यावरून न्यूझीलंडने सुरुवात केली. पण या दिवशी त्यांना नऊ फलंदाजांच्या मोबदल्यात १०६ धावांची भर घालता आली. जीत रावल (४७) आणि हेन्री निकोल्स यांनी दिवसाची पहिली ११ षटके समर्थपणे खेळून काढली. पण नदीमने रावलला पायचीत पकडत ही जोडी फोडली. रावल आणि निकोल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. रावल बाद झाल्यावर निकोल्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून ठेवता आला नाही. कर्ण आणि नदीम यांनी आपल्या फिरकीच्या तालावर न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवत त्यांच्यावर पराभव लादला. स्थिरस्थावर असलेल्या निकोल्सला कर्णने नदीमकरवी झेलबाद करीत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. निकोल्सने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९४ धावांची खेळी साकारली.

कर्ण आणि नदीम यांनी मंगळवारी फिरकी गोलंदाजीचा उत्तम वस्तुपाठ दाखवला. या दोघांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जास्त धावा करण्याची मुभा दिली नाही. कर्णने या वेळी न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद केला, तर नदीमने चार बळी मिळवीत त्याला सुयोग्य साथ दिली. या दोन कसोटी सामन्यांमध्ये कर्ण आणि नदीम यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मालिकेत कर्णने एकूण १६ आणि नदीमने १४ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

  • न्यूझीलंड ‘अ’ : २११ आणि ७९.३ षटकांत सर्व बाद २११ (हेन्री निकोल्स ९४, कर्ण शर्मा ५/७८, शाहबाझ नदीम ४/४१)
  • भारत ‘अ’ : ४४७.