अमेरिकेतील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याचा थरार साऱ्यांनीच अनुभवला, अगदी तसाच थरार भारतीय ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ यांच्यामधील सामन्यातही पाहायला मिळाला आणि योगायोगाने निकालही सारखाच लागला. चौरंगी एकदिवसीय मालिकेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून एका धावेने पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा कर्णधार मनीष पांडेने शतक झळकावल्यामुळे भारतीय संघ विजयासमीप पोहोचला होता. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयसाठी फक्त तीन धावांची गरज होती, पण भारतीय संघाला एकाच धावेवर समाधान मानावे लागले आणि पराभव स्वीकारावा लागला.

भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कुर्टिस पॅटरसन आणि निक मॅडिन्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी २३० धावांची भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पॅटरसन १६ चौकारांच्या जोरावर ११६ आणि मॅडिन्सनने ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ११८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनीषने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ११० धावांची खेळी साकारली. मनदीप सिंगने (५६) अर्धशतक झळकावत त्याला चांगली साथ दिली. मनीष बाद झाल्यावर संजू सॅमसनने (८७) सामन्याची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली. भारताला दोन चेंडूंंमध्ये तीन धावांची गरज असताना तो बाद झाला. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना शार्दूल ठाकूर दुसरी धाव घेताना धावबाद झाला आणि भारताला सामना गमवावा लागला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया ‘अ’ : ५० षटकांत ६ बाद ३२२ (कुर्टिस पॅटरसन ११५, निक मॅडिन्सन ११८; शार्दुल ठाकूर २/५०) विजयी वि. भारत ‘अ’ : ५० षटकांत ८ बाद ३२१ (मनीष पांडे ११०, संजू सॅमसन ८७, मनदीप सिंग ५६; डॅनियस वॉरल २/५७)