सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच, असे आपण नेहमी म्हणत असतो. ऑलिम्पिकबाबत भारतीय तिरंदाजांसाठी ही म्हण चपखल बसते. भारतीय तिरंदाज १९८८ पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहेत. मात्र त्यांना कधीही पदकाच्या आसपासही पोहोचता आलेले नाही. भारतीय तिरंदाज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, एवढेच नव्हे तर जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धाच्या मालिकेतही घवघवीत यश मिळवत असले तरी ऑलिम्पिकमध्ये त्यांचे बाण मुख्य निशाण्यापासून दूरच असतात, असेच चित्र पाहायला मिळाले आहे.

तिरंदाजी हा क्रीडा प्रकार भारतीयांसाठी नवीन नाही. रामायण व महाभारतापासून तिरंदाजी हा खेळ आपल्या संस्कृतीत रुजलेला आहे. मात्र या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जाचा विचार करता आपली प्रगती खूपच मंदगतीने सुरू आहे. १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीचा समावेश होता. त्यानंतर चौदा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये या खेळाचे सामने झाले आहेत. भारताने सेऊल येथे १९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला. पुरुषांच्या वैयक्तिक विभागात संजीवसिंग, लिम्बाराम व शामलाल मीणा यांनी सपशेल निराशा केली. तसेच सांघिक विभागातही त्यांचा सपशेल धुव्वा उडाला. ऑलिम्पिकपूर्वी लिम्बाराम याच्या कामगिरीविषयी खूप हवा निर्माण झाली होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून दर्जेदार तिरंदाजी करणारे लिम्बाराम पदक निश्चित घेईल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचे बाण हवेतच विरले. पुन्हा १९९२ मध्ये तसेच चित्र पाहावयास मिळाले. लिम्बारामसह चांगटे लालरेम्सागा व धुलचंद दामोर यांना ऑलिम्पिकची संधी मिळाली होती. मात्र वैयक्तिक व सांघिक या दोन्ही विभागांत त्यांच्या पदरी निराशाच पडली. १९९६ च्या ऑलिम्पिकमध्ये चांगटे व लिम्बाराम यांच्यासमवेत स्कालझांग दोरजे हादेखील उतरला होता. त्यांना वैयक्तिक स्पर्धेबरोबरच सांघिक विभागातही फारसे यश मिळाले नाही.

भारताचा एकही खेळाडू २००० च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नव्हता. २००४ मध्ये भारताने पुरुषांबरोबरच महिला गटातही भाग घेतला. सत्यदेव प्रसाद, तरुणदीप राय व सवाईयान मांझी यांना वैयक्तिक स्पर्धेबरोबरच सांघिक विभागातही निराशाच पदरी पडली. महिलांमध्ये डोला बॅनर्जी, रीनाकुमारी व सुमंगला शर्मा यांच्यावर भारताची भिस्त होती. मात्र त्यांना पहिल्या दहा क्रमांकांमध्येही स्थान मिळविता आले नाही. सांघिक विभागात आठव्या क्रमांकावर भारतास समाधान मानावे लागले. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात केवळ मंगलसिंग हा एकच खेळाडू पात्र ठरला होता. मात्र त्यालाही वाईट कामगिरीला सामोरे जावे लागले. महिलांमध्ये डोलासह प्रणिथा वर्धिनेनी व बोम्बयला देवी यांना पाठविण्यात आले होते. वैयक्तिक विभागात त्यांची कामगिरी खूपच सुमार दर्जाची झाली. सांघिक विभागात त्यांनी सातवे स्थान मिळविले. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये राहुल बॅनर्जी व तरुणदीप राय हे दुसऱ्या फेरीत पराभूत झाले, तर जयंत तालुकदार याचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. सांघिक विभागात पहिल्याच लढतीत भारताला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. महिलांमध्ये बोम्बयला देवी, दीपिकाकुमारी व चक्रवेलु स्वुरो यांच्यावर भारताची मदार होती. विशेषत: दीपिका हिने ऑलिम्पिकपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस यश मिळविले होते, तथापि तिच्यासह भारताच्या अन्य महिला खेळाडूंनाही चमक दाखविता आली नाही. सांघिक विभागात पहिल्याच सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आले.

रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये महिला गटात भारतीय खेळांडूंकडून काही आश्चर्य घडले तरच उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. अन्यथा भारतीय खेळाडूंकडून फारशी अपेक्षा न ठेवणेच योग्य होईल.

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू 

  • पुरुष : अतनु दास.
  • महिला वैयक्तिक व सांघिक : बोम्बयलादेवी, दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी मांझी.

 

 

मिलिंद ढमढेरे
milind.dhamdhere@expressindia.com