जुलै २०१४ मधली ही घटना. इंडोनेशियातील स्पर्धा खेळून परतलेला किदम्बी श्रीकांत हैदराबादस्थित गोपीचंद अकादमीत सराव करत होता. प्रचंड डोकेदुखीची तक्रार करणारा श्रीकांत चक्कर येऊन कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेनिनजायटीस अर्थात मेंदूच्या संसर्गजन्य तापाने त्याला ग्रासले होते. शुद्धीवर आल्यानंतर तो अकादमीतल्या सहकाऱ्यांना ओळखू शकला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आगमनाची वर्दी देणारा, क्रमवारीत अव्वल वीसमध्ये धडक मारणाऱ्या तरुण मुलाला आयसीयूमध्ये पाहून दूर गुंटूरवरून दाखल झालेल्या घरच्यांना चिंतेने घेरले. डॉक्टरांनी आधार दिला. पुरेशा विश्रांतीनंतर तो बरा होईल हा विश्वास त्यांनी दिला, मात्र स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये कधी परतेल हे त्याच्यावरच अवलंबून आहे हे डॉक्टरांनी स्पष्ट केले. केवळ चारच महिन्यांत जगाने दखल घ्यावी असा पराक्रम करत २१ वर्षीय श्रीकांतने पुनरागमन केले. लिन डॅन या अवलियाला नमवत श्रीकांतने सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
श्रीकांतच्या या ऐतिहासिक जेतेपदासाठी बॅडमिंटन विश्वातील काही गोष्टी समजून घेणे अनिवार्य आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या संरचनेप्रमाणे सुपर सीरिज प्रीमियर, सुपर सीरिज, ग्रां.प्रि. आणि इंटरनॅशनल चॅलेंज ही स्पर्धाची प्रतवारी. सुपर सीरिज अर्थातच जिंकायला सगळ्यात कठीण असा टप्पा. या स्पर्धेसाठी पात्र ठरणेही यश. जागतिक स्तरावरचे अव्वल खेळाडू सहभागी होत असल्याने चुरस तीव्र. २००७ मध्ये या सुपर सीरिज स्पर्धाना सुरुवात झाली. या अवघड स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांच्या नावावर आहे. मात्र तेव्हा सुपर सीरिज ही संकल्पनाच नव्हती. ‘सुपर सीरिज’च्या उदयानंतर सात वर्षांची प्रतीक्षा श्रीकांतच्या रुपाने संपुष्टात आली. टेनिसमध्ये जे स्थान ग्रँडस्लॅम स्पर्धेला ते बॅडमिंटनमध्ये सुपर सीरिजला. चेतन आनंद, अनुप श्रीधर, पारुपल्ली कश्यप या सगळ्यांनी वेळोवळी प्रयत्न केले. महिलांमध्ये सायना नेहवालने ही उणीव भरून काढली. मात्र पुरुष खेळाडूंसाठी हे जेतेपद दूरच राहिले. भारतीय पुरुष खेळाडूही या स्पर्धेचे जेतेपद पटकावू शकतात हा विश्वास श्रीकांतच्या जेतेपदाने दिला आहे.
जेतेपदाइतकेच श्रीकांतला ज्याला नमवत ते पटकावले त्याची महती जाणणेही अत्यावश्यक आहे. दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके, पाच विश्वविजेतेपदे, ऑल इंग्लंड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची पाच जेतेपदे आणि बॅडिमटन विश्वातल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धाची जेतेपदे नावावर असणारा चीनचा लिन डॅन हा श्रीकांतचा अंतिम लढतीतील प्रतिस्पर्धी. लिन डॅनचे नाव घेतले की प्रतिस्पध्र्याचा पराभव औपचारिक असतो. एका हाताची बोटं पुरतील एवढेच पराभव त्याने कारकिर्दीत पाहिलेले. सामन्यादरम्यान कोणत्याही परिस्थितीतून परत फिरून विजय मिळवण्याची डॅनची हातोटी अचंबित करणारी. दंतकथा सदरात मोडणाऱ्या लिन डॅनला त्याच्याच मायभूमीत चीतपट करण्याची किमया श्रीकांतने करून दाखवली. श्रीकांतला मिळालेला किंचित फायदा म्हणजे डॅनच्या पायाच्या घोटय़ाला झालेली जखम. मात्र ५० टक्के तंदुरुस्त डॅनला नमवणेही कठीणच आहे. त्यामुळे श्रीकांतचे यश भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंचा हुरूप वाढवणारे आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या कश्यपने यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुष बॅडमिंटन क्षेत्राचा चेहरा साहजिकच कश्यपचा. मात्र सुपर सीरिज जेतेपदाने आता हा मान श्रीकांतने मिळवला आहे. जागतिक क्रमवारीत त्याने कश्यपला मागे टाकले होते पण या जेतेपदाने श्रीकांतच्या घोडदौडीला पक्की बैठक मिळवून दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटूंमागे असणारी व्यक्ती म्हणजे पुल्लेला गोपीचंद. श्रीकांतही गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला. गुंटूर हे आंध्र प्रदेशातले मिरच्या, कापूस आणि तंबाखूच्या प्रसिद्ध. व्यवसायाने शेतकरी असलेल्या केव्हीएस कृष्णा यांची श्रीकांत आणि नंदगोपाळ ही दोन मुलं. दोघंही बॅडमिंटन खेळणारे, तेही दुहेरी. चांगल्या प्रशिक्षणासाठी दोन्ही भावंडांनी साडेतीनशे किलोमीटर दूर असलेल्या हैदराबादच्या गोपीचंद अकादमीची वाट धरली. सहा फूट उंची लाभलेल्या आणि ताकद कमावल्यास प्रतिस्पध्र्याना चकित करू शकेल अशा फटक्यांची क्षमता असलेल्या श्रीकांतला गोपीचंद यांनी हेरले. त्याला एकेरीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना दिली. तोपर्यंत स्वान्तसुखाय खेळणाऱ्या श्रीकांतने ही सूचना गांभीर्याने घेतली आणि तिथूनच त्याचा वारू भरधाव सुटला.
भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष बॅडमिंटनपटूंची संख्या प्रचंड असते. अनेकदा पात्रता फेरीतच बरीचशी ऊर्जा खर्च होते. मात्र या परिस्थितीतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या श्रीकांतने २००१ मध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धेत दुहेरीत दोन पदकांची कमाई केली होती. त्याच वर्षी पुण्यात झालेल्या अखिल भारतीय कनिष्ठ स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. २०१२ मध्ये त्याने मालदीव इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी थायलंड ग्रां.प्रि. स्पर्धा आणि राष्ट्रीय जेतेपदावर कब्जा करत श्रीकांतने आपला ठसा उमटवला होता.
डॅनच्या उमेदवारीच्या काळात गोपीचंद यांनी त्याला नमवण्याची किमया केली होती. गोपीचंद यांचा शिष्य असलेल्या श्रीकांतने त्यांच्या वाढदिवशीच डॅनला नमवत एक वर्तुळ पूर्ण केले आहे.