चेन्नई : राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारखे दिग्गज फलंदाज निवृत्त झाल्यावरही भारताकडे दर्जेदार फलंदाजीची फळी अस्तित्वात आहे. त्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला मायदेशात हरविणे अवघड जाईल, असे मत दुखापतीतून सावरलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने व्यक्त केले आहे. ‘‘आम्ही ऑस्ट्रेलियात खेळलेलो त्यापेक्षा ही वेगळी फलंदाजीची फळी आहे. ही फलंदाजीची फळी दर्जेदार आहे. भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीने आम्हाला चुकीचे ठरवतील. रणजी करंडक सामन्यात सचिन तेंडुलकरचे शतक त्याचा लाजवाब फॉर्म दर्शवितो. वीरेंद्र सेहवागचा दिवस असेल तर तो चौफेर फटकेबाजी करीत मैदानावर तुफान आणतो. आव्हानात्मक परिस्थितीचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत,’’ असे पॅटिन्सन यावेळी म्हणाला.