चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने भारतावर अंतिम फेरीत मात केली आणि सगळ्या क्रिकेट जगताला हादरा बसला होता. या सामन्यात भारतीय संघ कोणताही प्रतिकार न करता आऊट झाला होता. त्यातच नाणेफेक जिंकून कोहलीने फलंदाजी करण्याऐवजी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अंतिम सामन्यात विराट कोहलीने काही गोष्टी ठरवून केल्याचं कळतंय.

प्रशिक्षक अनिल कुंबळेंचा बळी घेण्यासाठी कोहलीने ठरवून हा निर्णय घेतल्याचं समजतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार नाणेफेकीआधी झालेल्या बैठकीत संघाने फलंदाजी घेण्याचं ठरलं होतं. साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३१९ धावसंख्येचा डोंगर उभारला होता, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ढेपाळला होता. मात्र भर मैदानात विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनी डोळे विस्फारले. कोहलीच्या या निर्णयामुळे प्रशिक्षक अनिल कुंबळेही अवाक झाल्याची माहिती समोर येतेय.

सुत्रांच्या माहितीनूसार, नाणेफेक झाल्यानंतर विराट ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर कुंबळेंनी त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. मात्र कोहलीने कुंबळेंना उडवा उडवीची उत्तरं दिली. ज्यामुळे सामना सुरु व्हायच्या काही काळ ड्रेसिंग रुममधलं वातावरण गंभीर बनलं होतं. ज्याचा अंतिम फेरीत नेमका काय परिणाम झाला हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे.

इंग्लंडचे महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनीही विराटच्या अंतिम सामन्यात गोलंदाजी घेण्याच्या निर्णयावर टीका केली होती. अनिल कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर देशभरातील चाहते विराट कोहलीवर नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय कर्णधाराच्या वागणुकीवर नाराज आहेत. त्यातच हा प्रकार समोर आल्यानंतर कोहली यावर काय प्रतिक्रीया देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.