हरमानप्रीतसिंगने स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रिक नोंदवल्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियावर ६-२ असा सहज विजय मिळवत सुलतान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. गतविजेत्या भारताला विजेतेपदासाठी रविवारी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
 सहाव्या मिनिटालाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत हरमान याने संघाचे खाते उघडले. तीनच मिनिटांनी परविंदरसिंगने गोल करत भारताला २-० असे आघाडीवर नेले. १९व्या मिनिटाला भारताच्या सिमरनजितसिंग याने सूर मारून अप्रतिम गोल केला. पवनकुमार याने ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीतील खेळाडूंना चकवीत संघाला ४-० असे आघाडीवर नेले. पेनल्टी स्ट्रोकचा फायदा घेत हरमानने आणखी एक गोल केला. पूर्वार्धात भारताने ५-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात भारताला सामन्याच्या ४४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत हरमानने गोल केला. या स्पर्धेत त्याचा हा सहावा गोल आहे.
६४व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पुन्हा होर्नरने दुसरा गोल केला.