अंतिम सामन्यामध्ये भारत कधीही थेट पोहोचलेला नाही. अखेरच्या साखळी सामन्यामध्ये एवढय़ा षटकांमध्ये अमुक धावा हव्यात, धावांची सरासरी जास्त असावी किंवा बोनस गुण मिळायला हवा, या समीकरणांमध्ये भारतीय संघ नेहमीच अडकलेला पाहायला मिळतो. या वेळी अखेरच्या साखळी सामन्यामध्ये जिंकूनच भारतीय संघ तिरंगी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरी गाठू शकणार असला तरी कोणत्याही समीकरणांचे ओझे त्यांच्यावर नसेल, कारण हा इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यास ते थेट अंतिम फेरीत पोहोचू शकतील. ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत दाखल झाला आहे. इंग्लंडच्या खात्यामध्ये पाच, तर भारताकडे दोन गुण आहेत. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे.
भारताला या वेळी कामगिरीबरोबरच तंदुरुस्तीची चिंता सतावत आहे. पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याचे दिसत आहे. आगामी विश्वचषक पाहता त्याला या सामन्यामध्ये खेळवण्याची फार कमी शक्यता आहे. त्यामुळे शिखर धवनबरोबर अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर अजिंक्यऐवजी विराट कोहलीला खेळवावे लागणार आहे. चौथ्या क्रमांकावर येऊन कोहलीला आपली छाप पाडता आलेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर त्याला फलंदाजीसाठी आणले जाईल. अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीला संघात कायम ठेवले जाऊ शकते. ‘वाका’ची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीला पोषक असल्याने भुवनेश्वर कुमारऐवजी ईशांत शर्माला संधी मिळू शकते, त्याला उमेश यादवची साथ लाभेल. अक्षर पटेल आणि आर. अश्विन या फिरकीपटूंनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून त्यांच्याकडून कामगिरीत सातत्य ठेवण्याची अपेक्षा असेल.
इंग्लंडचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. गोलंदाजीमध्ये स्टीव्हन फिन आणि जेम्स अँडरसन चांगल्या फॉर्मात आहेत. गेल्या सामन्यात या दोघांनी भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. फलंदाजीमध्ये इयान बेलला चांगला सूर गवसला आहे. कर्णधार ईऑन
मॉर्गनही चांगल्या धावा करताना दिसत आहे.
दोन्ही संघांचा विचार केला तर इंग्लंडचा संघ भारतापेक्षा नक्कीच चांगल्या फॉर्मात आहे. पण कोणत्याही क्षणी भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाला धक्का देण्यात माहिर आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल.

जर तुम्ही काही सामने जिंकलात आणि तुमच्या संघातील ११ खेळाडू कोणत्या मैदानात उतरतील, याबाबत तुम्ही ठाम नसाल तर त्याचा परिणाम विश्वचषकावर होऊ शकतो. येथील खेळपट्टय़ांचा पोत वेगळा असून एका खेळाडूवर अवलंबून चालणार नाही. संघातील सर्वच खेळाडू तंदुरुस्त असायला हवेत, तरच तुम्हाला सर्वोत्तम ११ जणांचा संघ निवडता येऊ शकतो. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये आव्हानात्मक धावा उभारून त्यांचा बचाव करता यायला हवा.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

संघाचे मनोबल या स्पर्धेमुळे चांगलेच उंचावलेले आहे आणि याचा नक्कीच फायदा आम्हाला विश्वचषकामध्ये होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही खेळावर अथक मेहनत घेतली असून त्याचेच फळ आम्हाला आता मिळत आहे. गोलंदाजीमध्ये स्टीव्हन फिन आणि फलंदाजीमध्ये इयान बेल चांगल्या फॉर्मात आहेत. आमच्यासाठी भारताविरुद्धचा हा सामना फार महत्त्वाचा असेल, कारण हा सामना जिंकल्यावर  अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे भारताशी दोन हात करायला आम्ही सज्ज झालो आहोत.
– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार / यष्टिरक्षक), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा.
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जो बटलर (यष्टिरक्षक), स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स टेलर आणि ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर.