भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना एका रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. गाझीयाबादवरुन कानपूरच्या दिशेने जाताना सुरेश रैनाच्या रेंज रोवर गाडीचा टायर अचानक फुटला. स्थानिक पोलिसांनी या घडलेल्या अपघाताबद्दल माहिती दिली. इटावा शहरातील फ्रेंड्स कॉलनी परिसरात हा अपघात घडला, यावेळी रैनाच्या गाडीचा वेग हा नियंत्रणात असल्याने तो या अपघातातून बचावला. जर गाडीचा वेग जास्त असता तर रैनाच्या जीवाला धोका पोहचू शकला असता असंही पोलिसांनी म्हणलं आहे.

रैना सध्या दुलीप करंडकात इंडिया ब्लू संघाचं कर्णधारपद भूषवतो आहे. उद्या या स्पर्धेत रैनाला भाग घ्यायचा आहे. यासाठीच रैना आपल्या गाडीने कानपूरच्या दिशेने निघाला होता, मात्र मध्येच हा अपघात झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर पोलिसांनी रैनाला कानपूरला पोहचायला एका नवीन वाहनाची सोय करुन दिली. या अपघातात रैनाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र गाडीत अतिरीक्त टायर नसल्यामुळे रैनाला रात्री दोन वाजल्याच्या सुमारास रस्त्यावर ताटकळत उभं रहावं लागलं. स्थानिक लोकांनी रैनाला पाहताच या अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात रैनाची निवड झाली नव्हती. बंगळुरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये रैना फिट नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्या दुलीप करंडकात इंडिया ब्लू संघाचं नेतृत्व करुन भारतीय संघात पदार्पण करण्याचा मानस सुरेश रैनाने केला आहे.