सलामीवीर थिरुश कामिनीचे नाबाद अर्धशतक आणि दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी या बळावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर नऊ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना जेमतेम ११८ धावा उभारल्या. यात कर्णधार सुझी बेट्सने सर्वाधिक ४२ धावा केल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यानंतर भारताच्या डावात स्मृती मंधाना लवकर बाद झाली, परंतु थिरुश कामिनी (नाबाद ६२) आणि दीप्ती शर्मा (नाबाद ४४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची नाबाद भागीदारी रचून भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला.

संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : ४१ षटकांत सर्व बाद ११८ (सुझी बेट्स ४२, अ‍ॅना पीटरसन २२; राजेश्वरी गायकवाड २/१५, झुलन गोस्वामी २/१७) पराभूत वि. भारत : २७.२ षटकांत १ बाद १२१ (थिरुश कामिनी नाबाद ६२, दीप्ती शर्मा नाबाद ४४; मोर्ना नेल्सन १/२३)

बीसीसीआयकडून २१ लाखांचे इनाम
न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकण्याची करामत दाखवणाऱ्या भारतीय महिला संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २१ लाख रुपयांचे इनाम घोषित केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ‘‘न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे कर्तृत्व दाखवणाऱ्या मिथाली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे अभिनंदन. १-२ अशा पिछाडीवरून मालिका जिंकत भारताने आपला संस्मरणीय ठसा उमटवला आहे.’’