भारतीय संघाला विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धेसाठी मुख्य स्टेडियमवर सराव करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारत व इराण यांच्यात गुरुवारी पात्रता फेरीचा सामना होणार आहे.
साखळी गटात भारतीय संघ शेवटच्या स्थानावर आहे. भारताच्या तुलनेत इराणचे पारडे जड मानले जात आहे. हा सामना आझादी स्टेडियमवर होणार आहे. मात्र या स्टेडियमवर सराव करण्याची भारतीय संघ व्यवस्थापनाने केलेली विनंती इराण फुटबॉल महासंघाने नाकारली.
‘‘जेव्हा भारतात इराणचा संघ बंगळुरू येथे सामना खेळण्यासाठी आला होता, त्या वेळी आम्ही त्यांना सामन्याच्या स्टेडियमवर सरावाची संधी दिली होती. तशी संधी आम्हाला त्यांनी देणे अपेक्षित होते,’’ असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.
इराणने भारतात झालेल्या पात्रता लढती ३-० असा विजय मिळवला होता. इराणमधील हवामान भारतीय खेळाडूंसाठी अतिशय प्रतिकूल आहे. त्याचा अनिष्ट परिणाम भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत कॉन्स्टन्टाइन म्हणाले, ‘‘एरवी आम्ही नवी दिल्ली येथे सराव करीत असतो. तेथील वातावरणापेक्षा येथे खूप थंड हवामान आहे. मुख्य स्टेडियमवरील सरावाच्या संधीचा अपवाद वगळता येथे आम्हाला खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’’
इराणच्या लढतीनंतर भारताला मायदेशात तुर्कमेनिस्तानबरोबर २९ मार्च रोजी लढत द्यावी लागणार आहे.