पोर्तो रिकोविरुद्ध ३ सप्टेंबरला मैत्रीपूर्ण सामना

मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात ३ सप्टेंबरला होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. कॅरेबियन देश पोर्तो रिको संघाविरुद्ध हा सामना होणार असून मुंबई ६१ वर्षांनंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९५५ साली भारत विरुद्ध यूएसएसआर असा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. तसेच उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल असोसिएशनसोबत संलग्न असलेला संघ पहिल्यांदा भारतात खेळणार आहे. जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) जागतिक क्रमवारीत रिको ११४व्या, तर भारत १५२ व्या स्थानावर आहे.

‘‘प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईत आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमींसाठी ही महत्त्वाची लढत आहे.

मुंबईत फुटबॉल संस्कृती आहे आणि आशा करतो की या लढतीसाठी भारताचे चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टटाइन म्हणाले.

भारतीय संघ

गोलरक्षक : सुब्राता पॉल, गुरप्रीत सिंग संधू, अरमिंदर सिंग

बचावपटू : रिनो अँटो, संदेश झिंगन, अर्नब मोंडल, किगन परेरा, चिंग्लेनसाना सिंग, प्रितम कोटल, नारायण दास, फुल्गान्सो कोडरेझो.

मध्यरक्षक : विनित राय, इयुगेनसन लिंगडोह, धनपाल गणेश, प्रोणय हॅल्डेर, जॅकीचंद सिंग, इसाक वानमल्सावमा, बिकाश जैरू, उदांता सिंग, हलिचरण नार्झरी, रोवलिन बोर्गेस, अ‍ॅलवीन जॉर्ज, गेरमनप्रीत सिंग, मोह. रफिक, अर्जुन तुदू.

आघाडीपटू : सुनील छेत्री, जेजे लाल्पेखलूआ, सुमीत पॅस्सी.