पुरुष हॉकीत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघासाठी शनिवारी श्रीलंकेसारख्या दुय्यम संघाविरुद्ध सोपा पेपर आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने नियमावली बदल करून ७० मिनिटांएवेजी ६० मिनिटांचा सामना केला आहे. तसेच दोन डावांऐवजी पंधरा मिनिटांच्या चार डावांचा हा सामना राहणार आहे. पेनल्टी कॉर्नर दिल्यानंतर व गोल झाल्यानंतर ४० सेकंदांची विश्रांती असेल. हे बदल प्रथमच आशियाई क्रीडा स्पध्रेत अमलात येणार आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या संघाला रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार असल्याने भारतीय संघ जेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. अनुभवी सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळविल अशी अपेक्षा आहे. १९९८मध्ये भारताने धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक मिळविले होते.