गुरजंत आणि मनदीपच्या गोलमुळे अखेरच्या हॉकी सामन्यात २-१ अशी सरशी

गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांनी साकारलेल्या गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरील नेदरलँड्सला २-१ अशी धूळ चारली आणि तीन सामन्यांच्या मालिकेवर वर्चस्व मिळवले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात नऊ नवख्या खेळाडूंचा भरणा करण्यात आला होता. मात्र तरीही त्यांनी अनुभवी नेदरलँड्सला धूळ चारली. गुरजंतने चौथ्या मिनिटाला आणि मनदीपने ५१व्या मिनिटाला गोल नोंदवले.

भारताने सुरुवातीलाच गोल करून यजमान संघावर दडपण आणले. गुरजंतने पेनल्टी कॉर्नरच्या बळावर हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. वरुण कुमारने ड्रगफ्लिक केलेला प्रयत्न हॉलंडच्या गोलरक्षकाने पॅडच्या साहाय्याने हाणून पाडला; परंतु पॅडला लागून चेंडू जेव्हा परतला, तेव्हा गुरजंतने त्वरेने आपल्या रीव्हर्स स्टिकची जादू दाखवली आणि गोल केला.

भारताच्या आक्रमणाने आपले खंबीर वर्चस्व दाखवून दिले. अरमान कुरेशीला भारताची आघाडी २-० अशी वाढवण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र ती वाया गेली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला नेदरलँड्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु भारतीय गोलरक्षक आकाश चिकटेमुळे नेदरलँड्सचा प्रयत्न फसला. त्यानंतर नेदरलँड्सला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु चिकटेने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.

भारताला १-० अशी आघाडी मिळाल्यामुळे तिसऱ्या सत्रात नेदरलँड्सने गोल साकारण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. मात्र भारताने सामन्यावरील नियंत्रण न गमावता त्यांच्यावर दडपण आणले. या वेळी भारताच्या बचाव फळीनेही आपली भूमिका चोख बजावली.

अखेरच्या सत्रात भारताने आपल्या आक्रमणाची तीव्रता वाढवली. गुरजंतला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढच्याच मिनिटाला सुमितला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळी भारतीय खेळाडूंनी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आणि मनदीपने गोल झळकावत आघाडी २-० अशी उंचावली.

त्यानंतर पदार्पणवीर गोलरक्षक सूरज करकेराने नेदरलँड्सच्या पेनल्टी कॉर्नरद्वारे गोलचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. अखेरच्या तीन मिनिटांमध्ये नेदरलँड्सने धारदार आक्रमण केले. मात्र करकेराने धीराने किल्ला लढवला. अखेर ५८व्या मिनिटाला सँडर डी विनला गोल करण्यात यश मिळाले; परंतु सामन्यावर मात्र भारताचे वर्चस्व राहिले.

‘‘भारतीय संघ खेळाच्या सर्व विभागांत अप्रतिम खेळला, त्यामुळेच नेदरलँड्सला हरवता आले. नेदरलँड्सचा संघात अनुभवाची मुळीच कमतरता नव्हती. त्यांच्या आठ खेळाडूंकडे १००हून अधिक सामन्यांचा अनुभवी गाठीशी आहे. त्यामुळे अशा संघाला हरवणे, हे खास आहे,’’ असे भारताचा कर्णधार मनप्रीतने सांगितले.

संपूर्ण संघ एकत्रितपणे ज्या पद्धतीने खेळला, ते कौतुकास्पद आहे. या संघातील काही खेळाडूंनी तर आपले पदार्पण केले, याकडेसुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. कोणतेही दडपण न घेता हे खेळाडू आत्मविश्वासाने खेळले.

मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार