आघाडी फळीतील अव्वल दर्जाचा खेळाडू एस.के.उथप्पाने दोन गोल केले, त्यामुळेच भारतीय पुरुष हॉकी संघाला न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध २-१ असा विजय मिळवता आला. या दोन संघांमधील पहिल्या सामन्यातही भारताला विजय मिळाला होता.

चुरशीने झालेल्या लढतीत पाचव्या मिनिटाला एस.व्ही.सुनीलने डी सर्कलमध्ये जोरदार मुसंडी मारली व निक्किन थिमय्याकडे पास दिला. थिमय्याने दोन बचावरक्षकांना चकवित उथप्पाकडे चेंडू तटवला. उथप्पाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलात तटवला. त्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक चाली केल्या, मात्र पूर्वार्धात भारताकडेच १-० अशी आघाडी होती.

उत्तरार्धाच्या प्रारंभापासूनच पुन्हा भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या ३४व्या मिनिटाला उथप्पाने चपळाईने चाल करीत प्रतिस्पर्धी संघातील दोन खेळाडूंबरोबरच गोलरक्षकासही चकवले व संघाचा दुसरा गोल केला. त्याचाही हा दुसरा गोल होता. त्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नरची एक संधी दवडली.

शेवटच्या १५ मिनिटांत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. त्यातील अनेक चाली भारताचा गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने थोपवल्या. मात्र ५७व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टीफन जेनीसने सुरेख गोल करीत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी केलेल्या चाली अपयशी ठरल्या.

भारताचा न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाबरोबर ६ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना नेल्सन येथे होईल.