भारताचा ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंगचे मत

मलेशियाच्या कुआंतम शहरात  झालेली आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धा भारताने जिंकली. या स्पध्रेत सर्वाधिक गोल करणाऱ्या भारताच्या रुपिंदर पाल सिंगने साऱ्या जगाला आकर्षित केले. सहा फूट उंच.. मनगटात कमालीची ताकद.. पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करण्याची कला.. यामुळेच यशस्वी ड्रॅग फ्लिकरच्या पंगतीत रुपिंदरने स्वत:चे एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. पंजाबच्या फरीदकोट येथील या २६ वर्षीय हॉकीपटूसाठी २०१६ हे वर्ष अतीमहत्त्वाचे आहे. ‘आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील जेतेपद हा कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण आहे. या स्पध्रेत मी ११ गोल केले आणि त्याहीपेक्षा भारताने सुवर्ण जिंकले, यापेक्षा आयुष्याला सुख देणारी गोष्ट नाही,’ असे रुपिंदर सिंगने सांगितले. हॉकी इंडियाच्या एका विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल झालेल्या रुपिंदरने कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेपासून ते २०१८ साली होणाऱ्या वरिष्ठ विश्वचषक स्पध्रेपर्यंत सर्व विषयांवर ‘लोकसत्ता’शी दिलखुलास गप्पा मारल्या. तो म्हणाला, ‘२०१६ साली मी काही लक्ष्य निश्चित केले होते आणि त्या दिशेने वाटचाल केली. समाधान याचे वाटते की ते लक्ष्य पूर्ण करण्यात मला यश मिळाले. कारकीर्दीत पहिल्यांदा एका स्पध्रेत ११ गोल करण्याची किमया साधली, हा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. माझ्या बोलण्यातून तो तुम्हाला नक्की जाणवत असेल.’

रिओ ऑलिम्पिकनंतर भारतात हॉकीमध्ये सकारात्मक वारे वाहू लागले आहेत. एकेकाळी ऑलिम्पिक सुवर्ण आणि हॉकी हे घट्ट समीकरण भारताची ओळख होते, परंतु मधल्या काही वर्षांत हॉकी मागे पडली. रिओनंतर हॉकीविषयी चर्चा होताना दिसत आहे, असे सांगताना रुपिंदरने या बदलाला खेळाडूंच्या कामगिरीचा उंचावलेला स्तर कारणीभूत असल्याचे अभिमानाने सांगितले. तो म्हणाला, ‘रिओ ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकीला चांगले दिवस आले. संघातील प्रत्येकाला त्याचे श्रेय जाते. खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळाचा दर्जा उंचावला आहे, त्यामुळे हॉकीला मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. वाढत्या प्रेक्षकवर्गामुळे खेळाडूंचे मनोबलही वाढले आहे आणि त्यामुळे ते आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे.’

रिओतील कामगिरीवर समाधान व्यक्त करताना रुपिंदरने पदक न जिंकल्याची खंत बोलून दाखवली. ‘प्रत्येक सामन्यात चढउतार येतात. कधी आपण चांगले खेळतो, तर कधी इच्छा असूनही चांगला खेळ होत नाही. सातत्य आणि एकाग्रता महत्त्वाची आहे. कामगिरी निराशाजनक झाल्यावर आम्हालाही दु:ख वाटते. रिओत मध्यंतरानंतराच्या खेळात सातत्यचा अभाव जाणवला, हे खरे आहे आणि त्यावर आमचे काम सुरू आहे. पण, भारतीय संघावर नजर टाकल्यास इतरांच्या तुलनेत तो युवा होता. अर्जेटिना आणि बेल्जियम यांच्या संघातील खेळाडू गेली दहा वष्रे एकत्र खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्या तुलनेत आपला संघ अननुभवी होता. त्यांना अनुभव मिळाल्यास त्यांच्या कामगिरीचा दर्जा उंचावेल,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.

पंजाबमध्ये हॉकीला खूप जुना इतिहास आहे. येथील वयस्कर माणसांच्या बोलण्यात सतत हॉकीचाच उल्लेख असतो. याच चर्चा ऐकत मी वाढलो. वडिलांना हॉकीचे वेड होतेच आणि चुलत भाऊ गगन अजित सिंग राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे मीही या खेळाकडे वळलो. वडील मला हॉकी सामने खेळायला घेऊन जायचे आणि भावाला पाहून प्रेरणा मिळत गेली, असे रुपिंदर सांगत होता.

भारत प्रबळ दावेदार : कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पध्रेत भारताला चांगली संधी आहे. फक्त त्यांनी सर्वोत्तम खेळ करण्याची आवश्यकता आहे. इतकी वष्रे त्यांनी घेतलेल्या मेहनतीची ही परीक्षा आहे आणि त्या मेहनतीवर विश्वास ठेवून बिनधास्त खेळ करावा. या स्पध्रेत भारतासमोर कुणाचे खडतर आव्हान असेल हे सांगणे कठीण आहे. कारण, सर्व संघ चांगली कामगिरी करत आहेत. सामन्याच्या दिवशी खेळाडू कशी कामगिरी करतात यावर निकाल अवलंबून असतो. आमचे प्रशिक्षक सांगत असतात की, ‘आपणच आपले मोठे शत्रू आहोत.’ ज्या दिवशी आपण चांगला खेळ करू त्या दिवशी विजय होतो, असे रुपिंदर म्हणाला.

लक्ष्य २०१८ विश्वचषक

२०१८च्या विश्वचषक स्पध्रेत पदक पटकावण्याचे ध्येय आहे आणि त्यासाठी आत्तापासून मेहनत घ्यायची प्रत्येक खेळाडूची तयारी आहे. हॉकी इंडिया लीगमुळे त्याला मदत मिळेल. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी फायद्याची आहे, तर कनिष्ठ खेळाडूंसाठी योग्य व्यासपीठ आहे.