भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या ३बाय ३ दक्षिण आशियाई बास्केटबॉल असोसिएशन (साबा) पात्रता स्पध्रेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत त्यांनी यजामन श्रीलंकेवर २१-१० असा विजय साजरा करून सुवर्ण जिंकले.
बासिल फिलिप, राजेश उप्पर, सिद्धांत शिंदे आणि जीवनंथम पांडी या खेळाडूंचा विजयी संघात समावेश होता.
भारताला साखळी फेरीत शनिवारी श्रीलंकेने नमवले होते आणि त्याचा वचपा भारताने रविवारी काढला. भारताने आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार केली. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत भारताने २०-१० अशा फरकाने नेपाळला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य
फेरीत त्यांनी श्रीलंकेवर १८-१० असा विजय मिळवला. अंतिम फेरीत श्रीलंकेशीच सामना असल्याने त्यांनी  सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत यजमानांवर दडपण आणले आणि बाजी मारली.
या विजयानंतर महाराष्ट्राचा सिद्धांत शिंदे म्हणाला, ‘‘भारतातील शंभर कोटीहून अधिक जनतेसाठी आम्ही हे सुवर्ण जिंकले. आशा करतो की या कामगिरीमुळे देशतील युवक प्रेरणा घेतील आणि बास्केटबॉलकडे वळतील.’’  दक्षिण आशियाई स्पध्रेचे जेतेपद पटकावल्यामुळे शिंदे, फिलिप, उप्पर आणि पांडी हे खेळाडू १५ व १६ ऑगस्टमध्ये बीजिंगमध्ये होणाऱ्या ३ बाय ३ जागतिक स्पध्रेसाठी पात्र ठरले आहेत.