गतविजेत्या तरुणदीप रॉयसह भारतीय खेळाडूंनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत पहिल्या दिवशी आघाडी घेतली. भारताच्या अभिषेक वर्मा व पूर्वशा शेंडे यांनी कंपाउंड प्रकारात अव्वल आघाडी मिळविली.
रिकव्‍‌र्ह प्रकारातील पात्रता फेरीत तरुणदीपने ६७६ गुणांची कमाई केली. त्याचा सहकारी गुरुचरण बेसरा याने ६६६ गुणांसह मुख्य फेरीत स्थान मिळविले, ऑलिम्पिकपटू जयंत तालुकदारचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. मात्र तरुणदीप व बेसरा यांनी जयंत याच्यासमवेत सांघिक विभागात उपान्त्य फेरीत स्थान मिळविले.
महिलांमध्ये दीपिकाकुमारीने रिकव्‍‌र्ह विभागात ६८६ गुणांसह अव्वल स्थान घेतले. बोम्बयलादेवी लैश्रामने ६४६ गुणांसह दुसरे स्थान घेतले. लक्ष्मीराणी माहीच्या साथीत दीपिका व लैश्राम यांनी सांघिक विभागात आगेकूच राखली.

व्हॉलीबॉलमध्ये विजय
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत, व्हॉलीबॉलमध्ये भारताने विजयी सलामी दिली. भारताने मालदीव संघाला ३-० (२५-९, २५-९, २५-१०) असे नमवले. महिलांमध्ये श्रीलंकेने नेपाळचा ३-० असा पराभव केला.

बॅडमिंटन, टेबल टेनिसची आज सलामी
शिलाँग : भारतीय बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपटूंच्या अभियानाची शनिवारपासून सुरुवात होणार आहे. सायना नेहवालच्या अनुपस्थितीत ज्वाला गट्टा आणि किदम्बी श्रीकांत भारतीय चमूचे नेतृत्त्व करणार आहे. पी.व्ही.सिंधू, रुथविका शिवानी, पी.सी. तुलसी आणि जी. वृषाली यांचा महिला गटात समावेश आहे. श्रीकांतसह बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम यांच्यावर भारताला पदक मिळवून देण्याची जबाबदारी आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा तसेच सिक्की रेड्डी आणि के. मनीषा दुहेरीत प्रतिनिधित्त्व करतील. टेबल टेनिस सांघिक प्रकारात भारताच्या गटात पाकिस्तान आणि मालदीवचा समावेश आहे. सात संघांच्या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत आगेकूच करतील.