महेंद्र सिंह धोनी रायजिंग पुणे सुपरजायन्टस या आयपीएल संघाच्या कर्णधारपदाहून पायउतार झाल्याचे वृत्त आहे. आयपीएलच्या १० व्या सीजनसाठी महेंद्र सिंह धोनी हा रायजिंग पुणे सुपरजायन्ट्सचा कर्णधार नसल्याचे वृत्त विस्डेन इंडियाने दिले आहे.  आयपीएल सुरू झाल्यापासून प्रथमच महेंद्र सिंह धोनी हा कर्णधाराच्या भूमिकेत नसेल. आपला खेळ अधिक चांगला व्हावा या दृष्टीने धोनीने हा निर्णय घेतला आहे. महेंद्र सिंह धोनीने गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले आणि विराट कोहलीला कर्णधार होण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये ही नव्या दमाच्या खेळाडूला कर्णधार होण्याची संधी मिळावी म्हणून धोनीने हे पद सोडल्याचे म्हटले जात आहे.  कर्णधारपद सोडण्यासाठी धोनीवर दबाव टाकण्यात आला का?  असे सुपरजायन्टस मधील सूत्रांना विचारण्यात आले. कर्णधारपद सोडण्यास धोनीवर कुठलाही दबाव टाकण्यात आला नाही असे स्पष्टीकरण त्यांनी विस्डेन इंडियाला दिले. धोनी हा देशातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. तेव्हा कोण म्हणेल की तुम्ही कर्णधारपद सोडा? परंतु, धोनीचीच इच्छा कर्णधारपदी राहण्याची नव्हती. नवीन नेतृत्वाला संधी मिळावी आणि खेळावर जास्त लक्ष केंद्रित करता यावे या करता धोनीने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी म्हटले. महेंद्र सिंह धोनीच्या पुणे संघाने मागील वर्षी १४ पैकी केवळ ५ सामने जिंकले होते. मागील वर्षी गुणतालिकेवर पुणे संघ सातव्या क्रमांकावर होता. त्यामुळेच नाराज होऊन संघ व्यवस्थापनाने धोनीला पायउतार होण्यास सांगितले अशी चर्चा होती परंतु व्यवस्थापनाने या गोष्टीस नकार दिला आहे.  ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा पुणे संघाचा कर्णधार होणार आहे. स्मिथने पुण्यासाठी ८ सामन्यांमध्ये २७० धावा केल्या होत्या.