भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचे सध्या खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरु आहेत. डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत श्रीकांतने एका वर्षात चौथ्या सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत श्रीकांतने वोंग विंग की व्हिन्सेटचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. याचसोबत श्रीकांतने भारताच्या सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे. सायनाने २०१० साली सिंगापूर, इंडोनेशिया आणि हाँगकाँग सुपरसिरीज स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, तर २०१२ साली सायनाने फ्रेंच, इंडोनेशिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व स्पर्धांमध्ये सायना विजेतीही ठरली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंमध्ये किदम्बी श्रीकांतने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काहीकाळ दुखापतींमुळे श्रीकांतला मैदानापासून लांब रहावं लागलं होतं, मात्र यासर्वांवर मात करत श्रीकांतने दणक्यात पुनरागमन करत डेन्मार्क ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. याच कामगिरीमुळे श्रीकांतने जागतिक क्रमवारीत आपल्या कामगिरीत सुधारणा करुन आठवं स्थान पटकावलं आहे.

अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली ह्यूनविरुद्ध होणार आहे. या सामन्यात श्रीकांतने विजय मिळवल्यास, एका वर्षात ३ सुपर सिरीज स्पर्धांची अंतिम फेरी जिंकण्याच्या सायना नेहवालच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. या वर्षभरात श्रीकांतसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत केलं आहे. एच. एस. प्रणॉय, समीर वर्मा, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी जागतिक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. टोकियो ऑलिम्पीक आधी या सर्व भारतीय खेळाडूंना आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. त्यामुळे याआधीच्या स्पर्धांमध्ये हे सर्व खेळाडू कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.