चीनमध्ये नुकत्याच झालेल्या फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेदरम्यान दोन शीख खेळाडूंना पगडी काढण्यास सांगितल्यामुळे या प्रकाराबद्दल क्रीडा मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाकडे गेल्यामुळे क्रीडा मंत्रालय आणि भारतीय बास्केटबॉल असोसिएशनला आता महासंघाकडून काय प्रत्युत्तर मिळतेय, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
‘‘याबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय महासंघाला कळवले असून त्यांच्याकडून प्रत्युत्तराची प्रतीक्षा आम्हाला आहे. त्यांच्याकडून प्रत्युत्तर आल्यावरच आम्हाला पुढील कार्यवाही करता येईल,’’ असे भारतीय बास्केटबॉल असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
क्रीडा मंत्री सरबनंदा सोनोवाल म्हणाले की, ‘‘यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांना याबाबतीत योग्य त्या मार्गदर्शक बाबी अथवा सूचना देण्यास भारतीय ऑलिम्पिक समितीला सांगितले आहे. या प्रकारामुळे आम्हाला धक्का पोहोचला. डोक्यावर पगडी बांधल्यामुळे खेळभावनेला किंवा खेळाला कोणताही धोका पोहोचत नाही. याआधी कधीही असा प्रकार घडला नव्हता. भारतीय सरकार सर्वधर्मीयांचा आदर करीत असून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
१२ जुलैला जपानविरुद्ध सामना सुरू होण्याच्या आधी अम्रितपाल सिंग आणि अमज्योत सिंग या दोन शीख खेळाडूंना कोर्टवर उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यांना डोक्यावरील पगडी काढण्यास सांगण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे पगडी बांधून खेळता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते. बुधवारी आंतरराष्ट्रीय महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दोहा येथे होणार असून भारतीय बास्केटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष के. गोविंदराज या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ते हा मुद्दा उचलून धरणार आहेत.