भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील क्रिकेट सामना म्हटला की दोन्ही बाजूंच्या खेळाडूंकडून मोठ्या प्रमाणात स्लेजिंग, खुन्नस पाहायला मिळते. अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांना डिवचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्याचाच प्रत्यय पहिल्या एकदिवसीय सामन्यात आला. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने घेतलेला डिआरएस अपयशी ठरल्यावर विराट कोहलीने त्याची ड्रेसिंग रुममधून खिल्ली उडवली. ऑस्ट्रेलियाने पंचाच्या निर्णयाला डिआरएसच्या माध्यमातून आव्हान दिले. त्यामुळे भारतीय फलंदाज भुवनेश्वर कुमार अडचणीत आला होता. मात्र स्टिव्ह स्मिथने डिआरएस घेऊनही तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रुममधून स्मिथची खिल्ली उडवली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे पहिले पाच फलंदाज संघाच्या १०० धावा होण्याआधीच तंबूत परतले. मात्र यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारतीय डाव सावरला. धोनीसोबत शतकी भागिदारी केल्यावर पांड्या तंबूत परतला. त्याने ६६ चेंडूंमध्ये ८३ धावा फटकावल्या. यानंतर भुवनेश्वर कुमार मैदानात आला. ४५ व्या षटकात भुवनेश्वर कुमार विरोधात ऑस्ट्रेलियन संघाने एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावले. यानंतर ऑस्ट्रेलियाने संघाने डिआरएसच्या माध्यमातून या निर्णयाला आव्हान दिले.

तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यावर मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राखला. कारण या रिप्लेमध्ये चेंडू पहिल्यांदा बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. चेंडू पॅडच्या संपर्कात न आल्याचेही रिप्लेमध्ये दिसले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा रिव्ह्यू वाया गेला. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथची खिल्ली उडवली. पंच एखाद्या खेळाडूला बाद देताना बोट उंचावतात, तशीच खूण करुन विराटने स्मिथची खिल्ली उडवली. या सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात कोहलीला फलंदाजीत अपयश आले.