इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेतील केरला ब्लास्टर संघाने प्रमुख खेळाडू म्हणून उत्तर आर्यलडच्या अ‍ॅरोन ह्युजची घोषणा केली. उत्तर आर्यलड संघाचे सर्वाधिक ४६ सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम ह्युजच्या नावावर आहे. मार्च १९९८ साली त्याने स्लोव्हाकियाविरुद्ध राष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि आत्तापर्यंत १०३ सामन्यांत त्याने प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या युरो चषक स्पध्रेतही तो खेळला होता. क्लबस्तरावरील १९९७ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी त्याने न्यूकॅसल युनायटेड एफसीकडून पदार्पण केले. २७८ सामन्यांत क्लबचे प्रतिनिधित्व केल्यानंतर ह्युजला अ‍ॅस्टन व्हिला एफसीने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले.

बलजित साहनी चेन्नईयन एफसीच्या ताफ्यात

चेन्नई : पहिल्या दोन हंगामात अ‍ॅटलेटिको डी कोलकाता क्लबकडून खेळणाऱ्या बलजित साहनी याला गतविजेत्या चेन्नईयन एफसीने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. इंडियन सुपर लीगच्या तिसऱ्या हंगामात बलजित चेन्नईयन क्लबकडून खेळणार आहे. २०१४ चे विजेते कोलकाता क्लबकडून बलजितने दोन गोल केले होते. कोलकाताने आय-लीगमधील  डीएसके शिवाजियन्सकडून  त्याला करारबद्ध केले होते. त्यांच्यातील करार संपल्यामुळे बलजितला चेन्नईने संघात दाखल करून घेतले.

नेलो व्हिंगाडा नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या प्रशिक्षकपदी

मुंबई : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने पोर्तुगालच्या नेला व्हिंगाडा यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगालच्या २० वर्षांखालील संघाने फिफा विश्वचषक (२० वर्षांखालील) स्पध्रेत तिसरे स्थान पटकावले.

मुंबईच्या चमूत गॅस्टन, वॉल्टर दाखल

मुंबई : मुंबई सिटी एफसी क्लबने आयएसएलच्या तिसऱ्या हंगामाकरिता अर्जेटिनाच्या गॅस्टन सँगोय आणि उरुग्वेच्या वॉल्टर इबानेझ यांना करारबद्ध केले आहे. मुंबई सिटीचे प्रशिक्षक अ‍ॅलेक्झांड्रे ग्युइमॅरीस यांनी या दोन्ही खेळाडूंमुळे संघाची ताकद वाढली असल्याचे मत व्यक्त केले.