भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) फक्त स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीवरही चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. एका आठवडय़ाभरात जगभरातील एक कोटी ७० लाख चाहत्यांनी दूरचित्रवाणीवरून आयएसएलचे सामने पाहिले असून भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील हा मैलाचा दगड ठरला आहे. विशेष म्हणजे, फिफा विश्वचषक स्पर्धेपेक्षाही भारतातील चाहत्यांनी आयएसएलला पसंती दिली आहे.
उद्घाटनाच्या दिवशी आयएसएलला दूरचित्रवाणीवरून तब्बल सात कोटी ४७ लाख चाहत्यांचा प्रतिसाद लाभला होता. फिफा विश्वचषकाला पहिल्या दिवशी भारतातून मिळालेल्या १२ पट जास्त प्रतिसाद आयएसएलला पहिल्या दिवशी मिळाला होता.
तब्बल आठ वाहिन्यांवरून आयएसएलच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. इंटरनेटवरही आयएसएलला तूफान प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारी सांगते. पहिल्या दोन दिवसांत तब्बल आठ लाख चाहत्यांनी या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या संकेतस्थळाला भेट दिली होती.