शाळेत किंवा मैदानात तुम्हाला असंख्य गोष्टी शिकता येतात. माझ्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत मी खेळातून बरेच काही शिकलो आहे. खेळ हा तुम्हाला जीवनात बरेच काही शिकवत असतो. लढण्याची जिद्द, खिलाडीवृत्ती या खेळामुळेच मिळतात. प्रत्येक क्रीडापटूच्या कारकिर्दीत अडथळे येतात. पण तेच अडथळे मैदानावर पुन्हा परतण्याची आणि खिलाडीवृत्तीनुसार लढण्याची नवी उमेद देत असतात, असे मत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देऊ पाहणाऱ्या आणि भारतीय फुटबॉलच्या इतिहासात नवा सुवर्णाध्याय घडवणाऱ्या इंडियन सुपर लीगची (आयएसएल) मुहूर्तमेढ गुरुवारी रोवण्यात आली. या वेळी आयएसएलच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
‘‘भारतातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, हे क्रीडापटू या नात्याने माझे उद्दिष्ट आहे. तरुणांचा खेळांमध्ये सहभाग वाढवणे, त्यांना निरोगी आणि सुदृढ बनवणे, यावर माझा भर राहील. त्यांना व्यावसायिक क्रीडापटू घडवणे, हे ध्येय नाही. भारत हे जगातील निरोगी आणि तंदुरुस्त राष्ट्र म्हणून जेव्हा ओळखले जाईल, तो माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल,’’ असेही सचिनने सांगितले. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल, संयोजक आयएमजी-रिलायन्सच्या नीता अंबानी उपस्थित होते. तसेच इंडियन सुपर लीगमधील आठ फ्रँचायझी संघांचे प्रतिनिधी म्हणून सचिन तेंडुलकर (कोची), अभिनेता अभिषेक बच्चन (चेन्नई), रणबीर कपूर (मुंबई), जॉन अब्राहम (नॉर्थईस्ट एफसी), वरुण धवन (गोवा) व समीर मनचंदा (दिल्ली), उत्सव पारिख (कोलकाता), कपिल वाधवान (पुणे) हे उपस्थित होते.
सचिन म्हणाला की, ‘‘माझ्या मते, प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतात अफाट गुणवत्ता आहे. पण त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही अथवा आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी पुरेशा संधी मिळत नाहीत. पण आयएसएलच्या माध्यमातून खेळाडूंना चमकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मी संयोजकांचा आभारी आहे.’’

फिफा क्लब विश्वचषकाच्या संयोजनासाठी उत्सुक -प्रफुल पटेल
इंडियन सुपर लीगमुळे भारतीय फुटबॉलला जे काही चांगले दिवस आलेत, त्या टप्प्यावर येणे सोपे नव्हते. देशातील फुटबॉलच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) मान्यता दिलेली आयएसएल ही जगातील पहिली स्पर्धा आहे. भारतात २०१७मध्ये १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. २०१७-१८मध्ये आम्ही फिफा क्लब विश्वचषकाच्या संयोजनासाठी बोली लावली असून या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.

लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती -जॉन अब्राहम
लहानपणी खेळ किंवा शिक्षण या दोन पर्यायांपैकी एक पर्याय मला निवडायचा होता. पण त्या वेळी खेळात इतका पैसा नसल्यामुळे मी शिक्षणाला प्राधान्य दिले. लहानपणापासूनच मला फुटबॉलची प्रचंड आवड होती. आता नॉर्थईस्ट फुटबॉल क्लबचे मालकीहक्क विकत घेऊन मी भारतीय फुटबॉलमध्ये योगदान देण्यासाठी उत्सुक आहे, असे नॉर्थईस्ट एफसी संघाचा सहमालक आणि अभिनेता जॉन अब्राहम याने सांगितले.

भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस -नीता अंबानी
गेल्या वर्षी मी एका कार्यक्रमासाठी उत्तराखंडमध्ये गेले होते. त्या वेळी मी असंख्य मुलांशी संवाद साधला. तुम्हाला काय हवे आहे, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी एकच उत्तर दिले, ‘आम्हाला शूज आणि फुटबॉल हवे आहेत. आम्हाला पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करायची आहे.’ त्यामुळेच आम्ही आयएसएलसारखी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक मुलाच्या भरभराटीसाठी  शिक्षणाबरोबरच खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. तळागाळातील युवा खेळाडूंना संधी मिळवून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे आयएसएलचे संयोजक असलेल्या आयएमजी-रिलायन्सच्या नीता अंबानी म्हणाल्या.