पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या छोटेखानी दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाने सराव सुरू केला. भारतीय संघ शुक्रवारी पश्चिम ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध ट्वेन्टी-२० तर शनिवारी ५० षटकांचा सराव सामना खेळणार आहे.
पर्थ स्क्रॉचर्स नावाने ओळखला जाणारा पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाचा वरिष्ठ संघ बिग बॅश ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळत असल्याने भारताविरुद्ध दुय्यम दर्जाचा संघ खेळणार आहे. सुरेश रैनाच्या जागी संघात समाविष्ट मनीष पांडे तसेच गुरकीरत सिंग मान यांच्यापैकी एकाला या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्राची कर्नाटकवर मात
पीटीआय, कटक
बलाढय़ कर्नाटक संघाला नमवत महाराष्ट्राने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत खळबळजनक विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावांचा डोंगर उभारला. निखिल नाईकने (६७), प्रयाग भट्टी (३९) व अंकित बावणे (३३) यांनी धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटकला १५८ धावाच करता आल्या.