पुढील महिन्यात बेल्जियम येथे होणाऱ्या हॉकी वर्ल्ड लीग (एचडब्लूएल) उपांत्य फेरी स्पध्रेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या संघात चार प्रमुख खेळाडूंना वगळण्यात आले असून त्यामध्ये ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग आणि मध्यरक्षक एस. के. उथप्पा यांचा समावेश आहे. या दोघांव्यतिरिक्त आक्रमकपटू मनदीप सिंग आणि सतबीर सिंग यांचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. रुपिंदर आणि उथप्पा यांना वगळल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरक्षक सरदार सिंग याला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. 

या चारही खेळाडूंनी गेल्या महिन्यात मलेशियात झालेल्या अझलन शाह चषक स्पध्रेत आणि भुवनेश्वर येथे झालेल्या जपानविरुद्धच्या मालिकेत या चारही खेळाडूंचा संघात समावेश होता. त्यांच्या जागी बचावपटू जसजीतसिंग कुलर आणि गुरमैल सिंग, मध्यरक्षक ललित उपाध्येय आणि आक्रमकपटू युवराज वाल्मीकी यांना संधी मिळाली आहे. जपानविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवडलेल्या २४ जणांच्या संघात गुरमैल, जसजीत, ललित आणि युवराज यांचाही समावेश होता.
एचडब्लूएल स्पध्रेत सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरणार आहे, तर गोलरक्षक पी. आर. श्रीजेश उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. हरजोत सिंग याची दुसरा गोलरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली आहे. बीरेंद्र
लाक्रा, मनप्रीत सिंग, कोठाजीत सिंग, व्ही. आर. रघुनाथ़, जसजीत आणि गुरमैल यांच्यावर बचावफळीची धुरा असेल. या स्पध्रेसाठी निवडलेल्या संघाबाबत मुख्य प्रशिक्षक पॉल व्ॉन अ‍ॅस म्हणाले की, ‘‘संघामध्ये खच्चून आत्मविश्वास भरलेला आहे. त्याचा नजराणा जपानविरुद्धच्या मालिकेत आपण पाहिला. नेमून दिलेल्या धोरणावर खेळाडू काम करत आहेत आणि या स्पध्रेत चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास आमच्यात आहे.’’
या स्पध्रेत दहा संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात भारत, फ्रान्स, पोलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा, तर ‘ब’ गटात चीन, आर्यलड, मलेशिया, ग्रेट ब्रिटन आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. भारताची पहिली लढत २० जूनला फ्रान्सविरुद्ध आहे.

भारतीय संघ
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश, हरजोत सिंग
बचावपटू : मनप्रीत सिंग, बीरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंग, व्ही. आर. रघुनाथ, जसजीत सिंग कुलर, गुरमैल सिंग.
मध्यरक्षक : गुरबाज सिंग, धरमवीर सिंग, सरदार सिंग, चिंग्लेनसना सिंग, ललित उपाध्येय
आघाडीपटू : एस.व्ही. सुनील, निक्कीन थिम्माईआ, युवराज वाल्मीकी, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग.