भारताच्या माजी क्रिकेटपटूंकडून टीका

आपल्या शत्रूला जाळ्यात अडकवण्यासाठी आपण खड्डा खणतो आणि त्याच्याऐवजी आपणच त्या खड्डय़ात पडतो अशीच अवस्था भारतीय क्रिकेट संघाबाबत पाहायला मिळाली. अनुकूल खेळपट्टीचे संघटकांचे प्रयोजन चुकीचे होते, अशीच प्रतिक्रिया अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीबाबत व्यक्त केली.

गहुंजे येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी धुव्वा उडवला. पाच दिवसांचा हा सामना अवघ्या तीन दिवसांमध्येच आटोपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओ’केफीने दोन्ही डावांत मिळून १२ बळी घेत शानदार कामगिरी केली.

या सामन्याविषयी ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे म्हणाले, ‘‘पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशी आपण खेळपट्टी तयार केली. दुर्दैवाने आपल्या फलंदाजांनी खूपच खराब कामगिरी केली. अनुकूल खेळपट्टीचा लाभ आपल्या गोलंदाजांनी घेतला नाही. उलट त्यांच्याच गोलंदाजांनी प्रभावी उपयोग करीत आपल्यावरच फिरकीचे अस्त्र उलटवले.’’

बोर्डे यांनी यापूर्वी पुण्यात झालेल्या अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टीतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. खेळपट्टीविषयी ते म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या खेळपट्टी समितीचे सदस्यांच्या आदेशानुसारच खेळपट्टी तयार केली जात असते. गहुंजेच्या खेळपट्टीवर दवबिंदूचा जराही लवलेश नव्हता. खेळपट्टी खूपच कोरडी होती. त्यामुळे फलंदाजांना खेळणे थोडेसे अवघड जात होते. मात्र आपल्या फलंदाजांनी अपेक्षेइतका आत्मविश्वास दाखविला नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त धावा केल्या याचाच अर्थ खेळपट्टी खूप काही खराब नव्हती. त्यांच्यासारखी सकारात्मक वृत्ती आपण दाखवायला पाहिजे होती.’’

ज्येष्ठ क्रिकेटपटू चेतन चौहान म्हणाले, ‘‘पहिल्या सामन्यात फिरकीस अनुकूल खेळपट्टी करीत संघटकांनी चुकीचे नियोजन केले. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज व गोलंदाज आपल्या खेळपट्टीवर कशी कामगिरी करतात याचा अंदाज आपण पहिल्या कसोटीत घ्यायला पाहिजे होता, मात्र आपण तसे केले नाही. कसोटी सामना पाच दिवसांचा असतो व पहिल्याच दिवशी फिरकी गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टी करण्यामागचे प्रयोजन मला कळले नाही. आपल्याकडे जसे फिरकी गोलंदाज आहेत़, तसे गोलंदाज त्यांच्याकडेही आहेत याचा आपण विचार केला नाही.’’

‘‘संघाबरोबर अनेक प्रशिक्षक ठेवण्यापेक्षा एक मुख्य प्रशिक्षक व एक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक एवढे दोनच प्रशिक्षक पाहिजेत. फलंदाजी, गोलंदाजी आदींबाबत अनेक प्रशिक्षक नेमण्याचे प्रयोजन मला कळले नाही. आमच्या वेळी केवळ एकच प्रशिक्षक व एक व्यवस्थापक असायचा तरीदेखील आम्ही अनेक सामनेजिंकले होते,’’ असेही चौहान यांनी सांगितले.

‘‘भारतीय फलंदाज एरवी स्थानिक सामन्यांच्या वेळी फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टय़ांवर आत्मविश्वासाने खेळतात, तसा आत्मविश्वास त्यांनी दाखवायला पाहिजे होता. जर ऑस्ट्रेलियाचे मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ यांनी आक्रमक खेळ केला, तसा दृष्टिकोन आपण दाखवायला पाहिजे होता. जगात कुठेही कशीही खेळपट्टी असली तरीही जर आत्मविश्वास दाखवीत आक्रमक खेळ केला तर कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवरही शतक टोलवू शकतो, हा दृष्टिकोन आपल्या फलंदाजांमध्ये दिसून आला नाही,’’ असे राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे यांनी सांगितले.