आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा नेहमीच काकणभर सरस कसे राहता येईल यासाठी प्रत्येक जण विचार करीत असतो परंतु त्यासाठी जो प्रयत्न करतो किंवा ऑउट ऑफ बॉक्स विचार करतो तोच जिंकतो. बहुधा हाच विचार डोक्यात ठेऊन आपल्या टीमचे कोच संजय बांगर यांनी नवी शक्कल लढविली आहे. त्याचा फायदा काय होईल ते येत्या दोन दिवसात समजेलच परंतु तूर्तास या पद्धतीची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान आठ डिसेंबर रोजी चौथा कसोटी सामना वानखेडेवर खेळला जाणार आहे. वानखेडेचे पिच क्युरेटर रमेश यांनी हे आधीच स्पष्ट केले आहे की दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून किंवा तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच चेंडू फिरकी घेणार आहे. जर आता हे समजेलच आहे की चेंडू टर्न घेणार आहे तर त्यासाठी आपली तयारी नको का?

जलदगती गोलंदाजी करण्यासाठी एक प्रकारचे धाडस लागते पंरतु फिरकी खेळण्यासाठी चातुर्य लागते असे आपल्या टीमचे बॅटिंग कोच संजय बांगर म्हणतात. त्यामुळेच त्यांनी फलंदाजांना वेगवेगळ्या पाच रंगाच्या चेंडूवर सराव करण्याचे सांगितले आहे.

इंग्लंडच्या टीममध्ये मोईन अली आणि आदिल रशीद हे आहेत. त्यांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी पाच वेगवेगळ्या रंगाच्या रबरी बॉलवर सराव सुरू आहे. प्रत्येक रंगाचा बॉल एक विशिष्ट संकेत देतो असे बांगर म्हणाले. प्रत्येक निराळ्या रंगाच्या बॉलचा सामना वेगवेळ्या पद्धतीने करायचा अशा सूचना बांगर यांनी खेळाडूला दिल्या आहेत.

रबर बॉलने सराव करण्याचे कारण म्हणजे या बॉलला नैसर्गिकरित्या उसळी मिळते. जर उसळी येण्याचा प्रसंग ओढवला तर त्याला सामोरे कसे जायचे हे यातून शिकायला मिळते. या रंगीत तालिमेचा व्हिडिओ भारतीय टीमने फेसबुकवर टाकला आहे. लाल रंगाच्या बॉलचा अर्थ आहे की ही फुल लेंथ डिलिवरी आहे. फलंदाजाने फ्रंटफूटवर येऊन हा बॉल खेळायचा आहे. बॉलच्या पीचपर्यंत येऊन स्पिन आणि बाउंसचा प्रभाव कमी करण्याचा सराव या बॉलद्वारे करायचा आहे.

निळ्या रंगाच्या बॉलचा अर्थ आहे आहे विकेटच्या बाहेर येऊन मिड ऑफवर हा बॉल खेळायचा आहे. नारंगी रंगाच्या चेंडुच्या अर्थ आहे की बॉल शॉर्ट पीच आहे फलंदाजाला आपला मागच्या पायाचा गुडघा खाली टेकवून स्वीप खेळायचा आहे. अशा रितीने आपल्या खेळाडूंची तयारी सध्या सुरू आहे.