अ‍ॅडलेडला निसटलेल्या विजयाच्या क्षणाच्या स्मृती अद्याप पिंगा घालत आहेत. ब्रिस्बेनला दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे संघनायक बदलले आहेत. स्वाभाविकपणे संघरचना, मानसिकता, दृष्टिकोन हे सारे बदलेल. ‘नवा गडी, नवं राज्य’ हे या कसोटीचे ब्रीदवाक्य असले तरी गाब्बाच्या जिवंत खेळपट्टीवर भारताचे नशीब पालटेल का, हीच क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे.
धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. कोहलीने दोन्ही डावांत शतके झळकावून आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली. पाचव्या दिवशी विजयाच्या उंबरठय़ापाशी भारतीय संघ पोहोचला, परंतु धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि ४८ धावांनी पराभव वाटय़ाला आला. पण अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरून धोनी परतला असल्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड हा ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला मानला जातो. कारण १९८८-८९पासून या मैदानावर कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियाला हरवता आलेले नाही. या मैदानावर धोनीसह विद्यमान संघातील कोणताही खेळाडू कसोटी सामना खेळलेला नाही. २००३-०४मध्ये झालेल्या भारताच्या अखेरच्या कसोटी सामन्यात सौरव गांगुलीने १४४ धावांची शानदार खेळी साकारली होती. धोनीला नेतृत्वाची धुरा सांभळताना गांगुलीचाच कित्ता गिरवावा लागणार आहे.
धोनी परतल्यामुळे वृद्धिमान साहा संघाबाहेर जाणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा खेळू शकणार नाही. दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार मायदेशात परतला आहे, तर धवल कुलकर्णी पदार्पणासाठी उत्सुक आहे. परदेशातील मागील सहा कसोटी सामन्यांपैकी चार सामन्यांत भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळला आहे.
वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. ऑफ-स्पिनर आर. अश्विनने मंगळवारी कसून सराव केला. या पाश्र्वभूमीवर अश्विन दुसऱ्या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे, परंतु भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळला तर रोहित शर्माला संघात स्थान मिळणार नाही.
परदेशातील कसोटी कर्णधारपदाची धोनीची कामगिरी अतिशय खराब आहे. ९ कसोटी सामन्यांत ५ पराभव, ३ अनिर्णित आणि एकमेव विजय ही मागील तीन दौऱ्यांची धोनीची कामगिरी आहे. मागील कसोटीसुद्धा भारताने गमावली, परंतु अ‍ॅडलेडला नेतृत्व कोहलीकडे होते.
कोहलीने पहिल्या कसोटीत आक्रमक पद्धतीने भारताचे कर्णधारपद सांभाळले, हीच आक्रमकता भारतीय संघाला जोपासावी लागणार आहे. दिल्लीच्या फलंदाजाला आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखावे लागणार आहे. सलामीवीर मुरली विजय, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा यांच्या खात्यावरसुद्धा चांगल्या धावा होत्या. ही भारतासाठी सकारात्मक गोष्ट आहे. पंरतु शिखर धवनचा फॉर्म ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.
भारतीय संघाने आपले अंतिम ११ खेळाडू निवडणे अखेरच्या क्षणापर्यंत लांबवले असले तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामन्याच्या पूर्वसंध्येला आपला संघ जाहीर केला आहे. नवा कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथने मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क या दोन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. रयान हॅरिसला तंदुरुस्तीचा प्रश्न भेडसावतो आहे, तर पीटर सिडलची अ‍ॅडलेडला कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. त्यामुळे या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. मायकेल क्लार्कची जागा शॉन मार्शने घेतली आहे, तर स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. युवा वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूडचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचा वेग आणि उसळणारे चेंडू हे सध्या चर्चेत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा ४५वा कसोटी कर्णधार म्हणून सूत्रे सांभाळणाऱ्या स्मिथसमोर भारताचे पहिले आव्हान उभे ठाकले आहे. चौथ्या क्रमांकाला न्याय देऊन तो कशी फलंदाजी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. क्लार्कने भारताविरुद्धच्या नऊ कसोटी सामन्यांत घरच्या मैदानावर ७६.९२ टक्के सरासरी राखली आहे. क्लार्कपणे धावांची टांकसाळ चालू राखण्याची जबाबदारी स्मिथवर असेल. अ‍ॅडलेडला स्मिथने शतक साकारले होते.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची प्रमुख धुरा असेल ती डेव्हिड वॉर्नरवर. त्याने अ‍ॅडलेडला दोन्ही डावांत शतके साकारली होती. शेन वॉटसन आणि सलामीवीर ख्रिस रॉजर्स यांच्याकडूनसुद्धा धावांची अपेक्षा आहे. जर पंचविशीतल्या स्मिथसाठी कर्णधारपद यशदायी ठरले, तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी एका नवा अध्यायाला प्रारंभ होईल.

प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन मार्श, मिचेल मार्श, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, जोश हॅझलवूड.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, वरुण आरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, लोकेश राहुल, नमन ओझा.
सामन्याची वेळ : सकाळी ५.३० वा. पासूऩ
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.
आम्ही आक्रमकच राहू – धोनी
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आम्ही आक्रमकतेला आक्रमकपणानेच उत्तर देऊ, असे हंगामी कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आक्रमकपणे खेळला असला तरी त्यांना पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारताच्या पवित्र्यामध्ये कोणताही बदल करणार नसून आम्ही आक्रमकच राहू, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले आहे.
‘‘आक्रमक पवित्रा घेणे हाच योग्य मार्ग आहे. आम्ही पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी धावांचा पाठलाग केला, हेच माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मुरली विजय आणि विराट कोहली यांची भागीदारी चांगलीच झाली. हे दोघे खेळत असताना आम्ही सामना जिंकण्याच्या जवळ होतो, पण दुर्दैवाने आम्हाला सामना जिंकता आला नाही,’’ असे धोनी म्हणाला.
दुसऱ्या सामन्याविषयी धोनी म्हणाला की, ‘‘या सामन्यातही आम्ही आक्रमक राहू. परिस्थितीवर सारे काही अवलंबून असते. तुमचे सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज कशी फलंदाजी करून भागीदारी रचतात, यावर बरेच काही अवलंबून असते.’’
दुखापतीविषयी धोनी म्हणाला की, ‘‘इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच मला दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभार स्वरूपाची नसल्याचे मला वाटले होते. त्यानंतर मी एकदिवसीय सामने आणि चॅम्पियन्स लीगही खेळलो. पण कालांतराने मला दुखापत गंभीर असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे आगामी विश्वचषकाला दुखापतीमुळे मुकावे लागू नये, यासाठी मला २०-२५ दिवसांच्या विश्रांतीची गरज होती. आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.’’
मालिकेतील आघाडी वाढवायची आहे – स्मिथ
ब्रिस्बेन : गाब्बाच्या वेगवान खेळपट्टीवर आम्ही मालिकेतील आघाडी वृद्धिंगत करण्यासाठीच उतरणार आहोत, असे मत ऑस्ट्रेलियाचा नवनिर्वाचित कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केले आहे.
‘‘दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल संघातील साऱ्यांनाच उत्सुकता आहे आणि या सामन्यात आम्ही मालिकेतील आघाडी वृद्धिंगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. गाब्बाची खेळपट्टी ही वेगवान असल्यामुळेच संघात जोश हॅझेलवूड आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश करण्यात आला आहे,’’ असे स्मिथने सांगितले.
मायकेल क्लार्कच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला येणार, असा प्रश्न विचारल्यावर स्मिथ म्हणाला की, ‘‘संघातील अनुभवी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांबरोबर या विषयावर आम्ही चर्चा केली आहे. कर्णधाराची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मीच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईन. यापूर्वी मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत होतोच. चौथ्या आणि पाचव्या क्रमांमध्ये जास्त फरक नसल्यामुळे माझ्यासाठी हे मोठे आव्हान नसेल.’’
मार्श बंधू नवा इतिहास रचणार
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियामध्ये भावंडांनी एकत्रितपणे खेळल्याची बरीच उदाहरणे असली तरी २००२नंतर एकही भावंडांची जोडी कसोटी सामन्यांमध्ये  खेळू शकलेली नाही. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या संघात पाहता येण्याची शक्यता आहे. शॉन मार्श हा ऑस्ट्रेलियाच्या संघात असून दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मिचेल मार्शची संघात निवड करण्यात आली आहे. हे दोघे जर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळले तर एक नवा इतिहास पुन्हा एकदा लिहिला जाईल.