डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेच्या जागतिक गटात प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला पुढील वर्षीच्या स्पध्रेकरिता आशिया ओशियाना विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) मंगळवारी सँटिआगो येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला.
भारतापाठोपाठ या गटात उझबेकिस्तानला दुसरे मानांकन देण्यात आले असून या दोन्ही संघांना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. २०१६ वर्षांतील मोसमातील पहिल्या सत्राला मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे.
भारत आणि उझबेकिस्तान हे जागतिक क्रमवारीत अनुक्रमे २१ व २५ व्या क्रमांकावर आहेत. चेक प्रजासत्ताक संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे जागतिक गटात प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. भारत आणि उझबेकिस्तानसह या गटात चीन, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. जागतिक गटात ग्रेट ब्रिटन आणि बेल्जियम यांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन देण्यात आले आहे.