राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकापूर्वी आयोजित सराव सामन्यात कॅनडावर ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८५ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार इशान किशनने ८६ चेंडूंत १६ चौकार आणि ७ षटकारांसह १३८ धावांची खेळी साकारली. रिकी भुईने ७१ चेंडूंत १० चौकार आणि ७ षटकारांसह ११५ धावांची खेळी केली. रिषभ पंत (६२), महिपाल लोमरूर (५५) यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अननुभवी कॅनडाचा डाव ११३ धावांतच आटोपला. लोमरूरने १९ धावांत ३ बळी मिळवले. भारताचा पुढील सराव सामना २५ जानेवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.