भारतीय महिला क्रिकेट संघातील सचिन तेंडुलकर अशी ओळख असणाऱ्या मिताली राजने महिला क्रिकेटकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. महिला विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. स्पर्धेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाची कर्णधार मिताली राजला एका पत्रकाराने तुमचा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारला होता. यावेळी कोणत्याही क्रिकेटच्या नाव न सांगता मिथालीने पत्रकाराला प्रतिप्रश्न केला. मितालीने या पत्रकाराला म्हटले की, मला विचारलेला प्रश्न तुम्ही भारतीय पुरुष संघातील खेळाडूला विचारु शकला का? तुम्ही त्यांना विचारा की, महिला क्रिकेटमधील कोणती खेळाडू आवडते. भारतामध्ये सध्या क्रिकेटची मोठी क्रेझ असली तरी भारतीय महिला क्रिकेटमध्ये कोणी फारसा रस दाखवत नाही. त्यामुळे मितालीने या पत्रकाराला प्रश्न विचारून महिला क्रिकेटला प्रोत्साहनाची गरज असल्याची भावनाच व्यक्त केली आहे.

यावेळी मिथाली म्हणाली की, मागील दोन वर्षांपासून महिला क्रिकेटमध्ये सुधारणा होत आहेत. मात्र पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये आजही मोठी दरी आहे. आमच्या सामन्यांचे टीव्हीवरील प्रक्षेपणामध्ये सातत्य नसणे हे एक कारण आहे. बीसीसीआय या विषयी सकारात्मक विचार करत असून, घरच्या मैदानावर मागील दोन मालिकांमध्ये टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर महिला क्रिकेटचा प्रभाव पाहायला मिळाला.
पुरुष क्रिकेटविषयी मिथाली म्हणाली की, त्यांनी एक विशिष्ट उंची प्राप्त केली आहे. तिथपर्यंत पोहोचणे महिला क्रिकेटला सध्याच्या घडीला शक्य नाही. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिला क्रिकेटला विशिष्ट उंची मिळवण्यासाठी पुरुष क्रिकेटरच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणे फायदेशीर ठरेल, असेही मिथाली यावेळी म्हणाली. भारतीय संघातून खेळत असताना तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत असता त्यामुळे प्रशिक्षक कोण असावे, यापेक्षा तो मेहनत करुन घेणारा असायला हवा, अशी भावना तिने व्यक्त केली.