भारतीय महिला क्रिकेटपटूंना परदेशी लीग खेळण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेटपटू आता महिलांच्या बिग बॅश लीगमध्येही खेळू शकतील.
‘भारतीय महिला क्रिकेटपटू आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील लीगमध्ये खेळू शकतात. बुधवारी बीसीसीआयच्या महिला क्रिकेट समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भारतीय महिला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश आणि इंग्लंडमधील सुपर लीगमध्ये खेळू शकतील,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयकडून या निर्णयाची फार पूर्वीच अपेक्षा होती, पण त्यामध्ये दिरंगाई झाल्याचे म्हटले जात आहे. या वर्षांपासून इंग्लंडमध्ये महिलांची सुपर लीग होणार आहे. ही स्पर्धा ३० जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे.
यापूर्वी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी याबाबत बीसीसीआयला विचारणा केली होती. पण त्यांच्याकडून अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही. आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला खेळाडूंना परवानगी देण्याबाबत पत्र पाठवले, त्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. महिलांच्या सुपर लीगसाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने परदेशातील १८ महिला क्रिकेटपटूंना बोलावले आहे. यामध्ये भारतासहित ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या देशांचा सहभाग आहे.