भारतीय महिला क्रिकेट संघाची महत्वाची फलंदाज वेदा कृष्णमुर्ती आता ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बीगबॅश लीग स्पर्धेत खेळणार आहे. होबार्ट हरिकेन्स या संघाने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामासाठी वेदासोबत करार केला आहे. बीगबॅश लीग ही ऑस्ट्रेलियातील महत्वाची टी-२० लीग मानली जाते. जगातील अनेक खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानानंतर वेदा बीगबॅश लीग स्पर्धा खेळणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत वेदाने महत्वाची भूमिका बजावलेली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वेदाने केलेली ७० धावांची खेळी भारताला उपांत्य फेरीत घेऊन आली होती. २५ वर्षीय वेदा कृष्णमुर्ती ही कर्नाटक राज्याची रहिवासी आहे. वेदाची आक्रमक फलंदाजीची शैली पाहून होबार्ट हरिकेन्स संघाने तिला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. मात्र असं असलं तरीही वेदाला होबार्ट हरिकेन्ससाठी फार थोड्या वेळासाठी खेळता येणार आहे. कारण याच कालावधीदरम्यान भारतीय महिलांचं संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

८ डिसेंबरपासून बीगबॅश लीग स्पर्धेच्या नवीन हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधी वेदा बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करणार आहे. याआधी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी बीगबॅश लीग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे या स्पर्धेतील अनुभवाचा या दोन्ही फलंदाजांना महिला विश्वचषकात फायदा झाला होता. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता वेदाला बीगबॅश लीग स्पर्धेत खेळण्याचा चांगलाच फायदा होईल यात शंका नाही.