जवळपास ३५ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नाच्या दिशेने कूच करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे सोमवारी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महिला खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या जथ्यासह हॉकीप्रेमींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. भारतीय महिला संघाने बेल्जियममध्ये झालेल्या जागतिक हॉकी लीग स्पध्रेत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावून रिओ ऑलिम्पिकच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
‘‘रिओ ऑलिम्पिकच्या शर्यतीत राहण्यासाठी अव्वल पाचमध्ये राहणे गरजेचे आहे, याची जाण आम्हाला होती.
शेवटचे दोन सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि प्रचंड दबाव आणि अपेक्षांचे ओझे असूनही मुलींनी शांतपणे खेळ केला. विशेषत: संघातील युवा खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे भारतीय महिला हॉकीचे भविष्य उज्ज्वल आहे, हे मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो,’’ अशी प्रतिक्रिया संघाचे प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी दिली. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने प्रथम आणि अखेरचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला सातत्याने अपयश आले. मात्र, यंदा त्यांनी पाचवे स्थान पटकावून ऑलिम्पिकच्या आशा कायम राखल्या आहेत.
जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेतून अव्वल तीन स्थानांवरील संघांना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे, तर इतरांना दुसऱ्या मार्गाने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यामुळे भारताला अजूनही ऑलिम्पिकचे तिकीट मिळू शकते. जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि चीन यांनी व्हेलेंसिआ येथे पार पडलेल्या जागतिक हॉकी लीगमधून, तर अँटवर्प येथे झालेल्या जागतिक हॉकी लीगद्वारे नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.
भारतीय महिला संघाची कर्णधार रितू राणी हिने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफ आयएच) अधिकृत माहितीची प्रतीक्षा असली तरी ऑलिम्पिकसाठीच्या सरावाला सुरुवात केल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही अजून त्या शर्यतीत आहोत.