भारताच्या महिला संघाला आशियाई स्क्वॉश स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना अंतिम लढतीत मलेशियाने २-० असे पराभूत केले. गतवेळी भारतीय संघाला कांस्यपदक मिळाले होते.

पहिल्या लढतीत मलेशियाच्या सिवासांगारी सुब्रमण्यमने भारताच्या सचिका कुमारीला ११-७, ११-६, १२-१० असे पराभूत केले. ज्योत्सना चिनप्पाने डेलिया अरनॉल्डला चिवट लढत दिली, मात्र ही लढत तिने ११-९, ११-१३, ८-११, ९-११ अशी गमावली. ज्योत्स्नाला यापूर्वी दोन वेळा डेलियाने पराभूत केले होते. मलेशियाने २-० अशी विजयी आघाडी मिळवल्यामुळे भारताच्या दीपिका पल्लिकलला खेळण्याची संधीच मिळाली नाही. प्रशिक्षक सायरस पोंचा म्हणाले, ‘‘सौरव घोशालच्या अनुपस्थितीत भारतीय पुरुष संघाला अपेक्षेइतके यश मिळविता आले नव्हते. महिलांनी त्या तुलनेत खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी लक्षात घेता भविष्यात भारतीय संघ यापेक्षाही अधिक अव्वल दर्जाचे यश मिळविल अशी मला खात्री आहे.’’