आशिया करंडक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. भारतीय महिलांनी पाकिस्तानवर १७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मिताली राजचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. मात्र भारतीय संघाने प्रभावी गोलंदाजी करत सामन्यासह आशिया करंडकदेखील जिंकला.

भारतीय महिला संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ५ बाद १२१ धावा केल्या. सलामीला आलेल्या मिताली राजने ६५ चेंडूंमध्ये ७३ धावांची नाबाद खेळी साकारली. २० षटके फलंदाजी करत मितालीने एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने कोणतीही साथ मिळत नसताना मितालीने चांगली फलंदाजी केली. मितालीने ७ चौकार आणि १ एका षटकाराच्या मदतीने ७३ धावा करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

भारताने दिलेल्या १२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकांमध्ये ६ बाद १०४ धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या संघाने १० व्या षटकापर्यंत अपेक्षित धावगती राखली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने पाकिस्तानला धक्के दिले. २६ चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी करणारी बिस्माह मारुफ बाद झाल्यावर भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड आणखी घट्ट केली. एकता बिश्तने २२ धावांमध्ये दोघींना माघारी धाडले. तर अनुजा पाटील, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, प्रिती बोस यांना प्रत्येकी एक पाकिस्तानी खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय महिलांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे पाकिस्तानला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या.

भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देणाऱ्या मिताली राजला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संघ संकटात सापडला असताना एका बाजूने समर्थपणे किल्ला लढवण्याची आणि फटकेबाजी करुन नाबाद राहण्याची कामगिरी मितालीने करुन दाखवली.