२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला वगळण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतल्यानंतर या खेळाचा पुन्हा समावेश करण्यासाठी अनेक राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. कुस्ती या खेळाला पाठिंबा मिळण्यासाठी संसदेत ठराव मंजूर करण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत.
‘‘सरकारशी आमची चर्चा सुरू असून कुस्ती या खेळाला पाठिंबा मिळण्याकरिता संसदेत ठराव संमत करण्याविषयीही आमची बोलणी सुरू आहेत. संसदेतील सर्व सदस्यांनी कुस्तीला वगळल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले. आयओसीच्या या निर्णयाविरोधात जपान, तुर्की आणि इराणसारख्या कुस्ती खेळणाऱ्या देशांनी विरोध केला आहे.