कुस्ती भारताचा पारंपरिक खेळ महाभारतापासून खेळला जातो, असे म्हटले जाते. भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदकही कुस्तीमध्येच मिळाले. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी इतिहास रचला. अटकेपार तिरंगा फडकावला. १९५२ साली हेलसिंकीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर भारताला कुस्तीमधील अधिक पदकांची अपेक्षा होती, पण आपले मल्ल फक्त हिंद केसरीपुरतेच मर्यादित राहिले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आणि देशातील युवा वर्ग कुस्तीकडे वळायला लागला, पण ऑलिम्पिकमध्ये अजूनही कुस्तीत भारताला सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. त्यामुळे या वेळी भारतीय मल्ल रिओमध्ये सुवर्णपदकावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील. रिओमध्ये भारतीय मल्लांचा एकच ध्यास असेल आणि तो म्हणजे सुवर्णपदक.

या वेळी ऑलिम्पिकपूर्वीच देशाच्या न्यायालयामध्ये कुस्तीचा आखाडा रंगला. वजनी गट बदलल्यावर एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा न खेळता ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न सुशील पाहत होता. आतापर्यंत देशाला दोन ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा तो एकमेव, पण त्यासाठी ज्याने ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली त्या नरसिंग यादवला कसे वगळून चालेल? कुस्ती महासंघ आणि न्यायालयानेही सुशीलची भूमिका अमान्य केली. सुशीलने आतापर्यंत देशाला कुस्तीमध्ये कांस्य आणि रौप्यपदक मिळवून दिले आहे, पण सुवर्णपदकाला त्यालाही गवसणी घालता आलेली नाही. तो या ऑलिम्पिकला जाणार नसला तरी त्याचा सख्खा मित्र योगेश्वर दत्तवर (फ्री-स्टाइल ६५ किलो) रिओमध्ये ही जबाबदारी असेल. योगेश्वरने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे त्याच्यासारखा दुसरा अनुभवी मल्ल भारतीय ताफ्यात नाही. त्याच्याकडे तीन ऑलिम्पिक वाऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे योगेश्वरकडून या वेळी सुवर्णपदकाची भारताला अपेक्षा असेल.

खाशाबा जाधव यांच्यानंतर नरसिंग यादववर (फ्री-स्टाइल ७४ किलो) महाराष्ट्राच्या नजरा असतील. लंडन ऑलिम्पिमकध्ये नरसिंग सहभागी झाला होता, पण त्याला रित्या हातीच परतावे लागले होते, पण त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये नरसिंगच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला आहे. विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावत नरसिंगने ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवली. या स्पर्धेत पदक पटकावून ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका मिळवणारा तो पहिला भारतीय मल्ल ठरला आहे. त्याने जर कामगिरीत सातत्य राखले तर भारताला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करणे गैर नसेल. ऑलिम्पिकमध्ये रशिया आणि इराणच्या मल्लांकडून कडवी लढत मिळू शकते, असे मत नरसिंगने व्यक्त केले आहे.

संदीप तोमरने (फ्री-स्टाइल ५७ किलो) मंगोलियामध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये कांस्यपद पटकावले आणि रिओवारी निश्चित केली. ही त्याची पहिलीच ऑलिम्पिकवारी असणार आहे. लहानपणापासूनच संदीपला कुस्तीचा वारसा मिळाला. त्याच्या गावामध्ये शेतकरी कमी आणि मल्ल जास्त अशी स्थिती आहे. संदीपकडे ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धेचा अनुभव नाही, पण ही स्पर्धा त्याला चांगला अनुभव देऊ शकते. त्याचबरोबर संदीप जर पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरला तर त्यालाही पदक दूर नसेल.

अवघ्या १२ व्या वर्षी रविंदर खत्री (ग्रीको रोमन ८५ किलो) कुस्तीच्या आखाडय़ात उतरला आणि त्यामध्येच रमला. सुरुवातीला रविंदर देशी कुस्ती खेळायचा, पण त्यानंतर प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार त्याने आपली शैली बदलली आणि ग्रीको रोमन प्रकारमध्ये त्याने खेळायला सुरुवात केली. ऑलिम्पिक पात्रता फेरीत किर्गीस्तानचा मल्ल उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला आणि रविंदरला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. भारतीय सेनादलातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला रविंदर हा पहिला मल्ल ठरला आहे. ही त्याची पहिलीच ऑलिम्पिक वारी असली तरी नशिबाने मिळालेल्या या संधीचे पदकात रूपांतर करण्यासाठी रविंदर सज्ज झाला आहे.

कुस्तीमध्ये ताकदीबरोबर तंत्र, अनुभवही महत्त्वाचा असतो, हे हरदीप सिंग रविंदर खत्री (ग्रीको रोमन ९८ किलो) सांगत असतो. कझाकस्तानमधील ऑलिम्पिक पात्रता फेरीत रौप्यपदक पटकावत हरदीपने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ही त्याची पहिलीच ऑलिम्पिक वारी असेल, पण आतापर्यंतचा अनुभव विकसित झालेले तंत्र, ताणावर मात करण्याचे कसब, या गोष्टींमुळे हरदीप ऑलिम्पिक पदकाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवूनच रिओमध्ये जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या कुस्तीने हरयाणामध्ये वेग पकडला. हरयाणामध्ये कुस्तीच्या आखाडय़ांमध्ये गर्दी व्हायला लागली. प्रत्येक घरातील मुलगा कुस्तीच्या आखाडय़ात उतरू लागला, पण रूढी-परंपरेत अडकलेल्या लोकांनी मुलींना मात्र कुस्ती खेळण्यासाठी कडाडून विरोध केला, पण गीता फोगट, विनेश फोगट, बबिता कुमारी यांनी हा विरोध मोडीत काढत भारतामध्ये महिला कुस्तीची मुहूर्तमेढ रोवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिलांना स्थान मिळवून दिले. विनेशने (फ्री-स्टाइल ४८ किलो) इंस्तबूल येथे झालेल्या पात्रता फेरीत सुवर्णपदक पटकावत ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. तीची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा असेल, पण आतापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जावरची तिची कामगिरी ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा असेल. बबिता कुमारीनेही (फ्री-स्टाइल ५३ किलो) महिला कुस्तीमध्ये आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. २००९ ते आतापर्यंत बबिताने बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदके जिंकवून दिली आहे. बबिताची ही पहिलीच ऑलिम्पिक वारी असली तिला वेध लागले आहेत पदकाचे. साक्षी मलिकने (फ्री-स्टाइल ५८ किलो) गेल्या दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मजल मारली आहे. तिची ही पहिलीच ऑलिम्पिक फेरी असून हा अनुभव तिच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.

कुस्तीमधील ऑलिम्पिक पदके

  • खाशाबा जाधव (कांस्यपदक : हेलसिंकी- १९५२)
  • सुशील कुमार (कांस्यपदक : बीजिंग- २००८, लंडन : रौप्यपदक- २०१२),
  • योगेश्वर दत्त (कांस्यपदक : लंडन- २०१२)

 

रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू 

  • पुरुष : योगेश्वर दत्त – (फ्री-स्टाइल ६५ किलो), नरसिंग यादव (फ्री-स्टाइल ७४ किलो), संदीप तोमर (फ्री-स्टाइल ५७ किलो), रविंदर खत्री (ग्रीको रोमन ८५ किलो), हरदीप सिंग (ग्रीको रोमन ९८ किलो).
  • महिला : विनेश फोगट (फ्री-स्टाइल ४८ किलो), बबिता कुमारी (फ्री-स्टाइल ५३ किलो), साक्षी मलिक (फ्री-स्टाइल ५८ किलो).

 

– प्रसाद लाड
lad@expressindia.com