धारदार आक्रमणाच्या जोरावर बेल्जियमने भारताची अपराजित्वाची मालिका २-१ अशा फरकाने खंडित केली आणि चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत आव्हान टिकविले. चुरशीने झालेल्या या सामन्यात बेल्जियमकडून हेन्ड्रिक्स व ट्रयेन्स यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा एकमेव गोल देविंदर वाल्मीकीने नोंदवला.

सामन्याच्या सुरुवातीला बेल्जियम संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. त्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांवर अनेक चाली केल्या, मात्र पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलफलक कोराच होता. सामन्याच्या २२व्या मिनिटाला बेल्जियमला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर गोल जमला नाही तर भारतीय खेळाडूंचे पायावर चेंडू मारून पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळवायचा असे तंत्र बेल्जियमच्या खेळाडूंनी अवलंबले. त्यामुळे त्यांना आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी दुसऱ्या कॉर्नरवर हेन्ड्रिक्सने अचूक फटका मारला व २४व्या मिनिटाला बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमला या आघाडीचा आनंद फार वेळ घेता आला नाही. भारतीय खेळाडूंनी कोणतेही दडपण न घेता चाली कायम ठेवल्या. भारताच्या देविंदर वाल्मीकीने बेल्जियमच्या डी-सर्कलमध्ये मुसंडी मारली व सुरेख गोल केला. पूर्वार्ध संपण्यास केवळ ४० सेकंद बाकी असताना हा गोल करीत त्याने १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात बेल्जियमच्या खेळात आक्रमकतेबरोबरच धसमुसळेपणाही दिसून येत होता.

उत्तरार्धातही बेल्जियमने सुरुवातीपासूनच आक्रमक चालींवर भर दिला होता. सामन्याच्या ३१व्या व ३३व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा लाभ घेण्यात ते अपयशी ठरले. भारतालाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा फायदा ते घेऊ शकले नाहीत. बरोबरीची ही कोंडी बेल्जियमच्या ट्रयेन याने ४२व्या मिनिटाला फोडली. त्याने भारताचा गोलरक्षक पी. श्रीजेशला चकवत सुरेख गोल केला व संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमच्या खेळाडूंनी त्यानंतर आणखी तीन वेळा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळविली. मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.

भारताच्या तुलनेत बेल्जियमच्या आक्रमणात चांगला समन्वय होता. भारतीय खेळाडूंनी जोरदार चाली केल्या, मात्र खेळाडूंमधील समन्वयाच्या अभावी त्यांना गोलसंख्येत भर घालता आली नाही. बेल्जियमने प्रत्येक खेळाडूमागे एक खेळाडू असे धोरण उपयोगात आणले होते. त्यामुळे अनेक वेळा भारतीय खेळाडू बुचकळ्यात सापडले.

भारताचा तीन सामन्यांमध्ये हा पहिला पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी जर्मनीला ३-३ असे बरोबरीत रोखले होते, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला २-१ असे हरवले होते.